अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :-हिवरे बाजार या गावातील एका व्यक्तीचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्याची गुरूवारच्या यादीत नोंद झाली.
परंतु, रॅपिड अँटीजेन टेस्ट केलेल्या, मात्र पोर्टलवर नोंद न झालेल्या रुग्णांची नोंद घेतली जात असल्याने हे नाव पुढे आल्याचे नगर तालुका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
राज्यात करोनामुक्तीचा पॅटर्न म्हणून नावाजलेल्या हिवरे बाजार गावाकडे या प्रकारामुळे अनेकांचे लक्ष गेले. परंतु या प्रकारामुळे हिवरेबाजार करोना मुक्ती पॅटर्नवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले,
याप्रकरणी पोपटराव पवार यांनी आरोग्य यंत्रणेच्या या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत पत्र देणार असल्याचे सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी कि, रॅपिड अँटीजेन तपासणीत पूर्वी ज्यांच्या अहवालाची नोंद झाली नव्हती, ती आता घेतली जात आहे.
यादीत समावेश असलेल्या व्यक्तीला 6 मे रोजी करोना संसर्गाचे निदान झाले होते. खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यादरम्यान 15 मे रोजी त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोपटराव पवार यांनी दिली.
तसेच, त्यावेळी आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण होता. त्यामुळे काही नोंदी झाल्या नव्हत्या. त्या नोंदी सरकारच्या सूचनेनुसार आता घेतल्या जात आहेत.
त्यानुसार हे नाव आले असावे, असे पोपटराव पवार यांना आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले. आरोग्य यंत्रणेच्या या कारभारावर पोपटराव पवार यांनी नाराजी व्यक्त केली.