अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-नागरिकांना आता कोरोनाचे गांभीर्य राहिलेले नाही. लोकांमधील करोनाबाबतचा निष्काळजीपणा वाढला आहे. यातूनच सुपर स्प्रेडरच्या घटना घडत आहे.
यातच आता करोनावरील लस आली आहे. आता सर्व काही ठीक होईल, असं नागरिकांना वाटत आहे. असा समज नागरिकांनी केला असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले आहे.
करोनावरील लस घेतल्यानंतर पुन्हा करोनाचा संसर्ग होणं ही दुर्मिळ घटना आहे. पण करोनावरील लसीचा डोस घेतल्यानंतरही करोनाचा प्रादुर्भाव होत असेल तर जीवाला असलेला धोका कमी असतो.
सर्व पस्थितीत करोनाचा सामना करण्याची प्रक्रीया आता निश्चित झाली आहे, असं हर्षवर्धन यांनी स्पष्ट केलं. सरकारने मंजुरी दिलेल्या दोन्ही लसी( कोविशिल्ड, कोवॅक्सिन ) सुरक्षित आणि प्रभावी आहेत. या लसींचे डोस घेतल्यानंतर साइड इफेक्ट दिसून आलेले नाहीत.
तरीही अनेकांना या लसींवर संशय आहे. व्हॉट्सअॅपवरून फॉरवर्ड झालेल्या कुठल्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका, लसीकरणासाठी पुढे या, असं आवाहन हर्षवर्धन यांनी नागरिकांना केलंय. कोविन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करोनावरील लसीकरण मोहीम सुरू आहे.
आता १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना ५० हजार केंद्रांवर लसीकरण केले जाईल. आतापर्यंत यासाठी मोठ्या संख्येत नोंदणी झाली आहे.
लसीकरणासाठी केंद्रावरही नोंदणी करता येऊ शकते. करोनासंबंधीचे वर्तन आणि लसीकरणासाठी थोडा वेळ दिल्यास आपल्याला करोनावर विजय मिळवता येईल, असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्ट केलं.