अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-महाराष्ट्रासाठी लागणाऱ्या रेमडेसीवीर उपलब्धतेसाठी औषधाचे उत्पादन दुप्पट करावे, असे आदेश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रेमडेसीवीर बनवणाऱ्या सात कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना दिले.
गुरुवारी सायंकाळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रेमडेसीवीर बनवणाऱ्या सात कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. याबैठकीला एफडीए मंत्री राजेंद्र शिंगणे आणि एफडीएचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोरोनाच्या गंभीर रुग्णांना वाचवण्यासाठी सध्या रेमडेसीवीर हे औषध कामी येत असून त्याचा तुटवडा जाणवू लागला आहे.
यामुळे एकीकडे कोरोना लसीच्या तुटवड्याशी दोन हात करत असताना राज्य सरकारला आता रेमडेसीवीरचा पुरेसा साठाही करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागत आहेत.
त्यासाठी रेमडेसीवीरचे उत्पादन दुप्पट करा, असे आदेश मंत्री टोपे यांनी दिले. राज्यात कोरोना लसीच्या उपलब्धतेवरून केंद्र आणि राज्यात कलगीतुरा रंगला आहे. महाराष्ट्रात गुरुवारी २३ लाख कोरोना लसी उपलब्ध असल्याचा खुलासा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला.
तसेच पुढच्या तीन दिवसांची लस ही वाटेवर आहे. असे असताना राज्यात कोरोना लसीकरण केंद्रे बंद पडत आहेत. ही परिस्थिती महाराष्ट्र राज्यातच नसून ओडिया, आंध्र प्रदेश सारख्या राज्यांतही उद्भवली आहे.
कोरोना उपचारांमध्ये निकषात बसत असणाऱ्या रुग्णांना देण्यात येणारे रेमडेसिवीर हे इंजेक्शन मेडिकलवर मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. अचानक तुटवडा निर्माण झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.