सहा महिन्यात लसीकरण पूर्ण करण्याचा मानस – आरोग्यमंत्री राजेश टोपे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी ७१ लाख नागरिकांना मोफत लसीकरणाचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला असून हा कार्यक्रम सहा महिन्यात पूर्ण करण्याचा मानस असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.

मात्र लसींच्या उपलब्धतेबाबत आव्हानात्मक परिस्थिती असल्याने इच्छा असूनही १ मे पासून लसीकरणास प्रारंभ होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ज्येष्ठ मंत्र्यांची समिती १८ ते ४४ वयोगटाच्या नागरिकांच्या लसीकरणासाठी सुक्ष्म नियोजन करणार असल्याचेही श्री. टोपे यांनी सांगितले.

मंत्रालयात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना आरोग्यमंत्री श्री.टोपे बोलत होते. त्यांच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे असे :

  • १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी ७१ लाख नागरिकांच्या लसीकरणासाठी १२ कोटी डोसेस आवश्यक असून त्यासाठी ६५०० कोटी रुपयांच्या खर्चाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
  • लसीकरणाचा हा कार्यक्रम सहा महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी १२ कोटी डोस लागणार असून दर महिन्याला दोन कोटी लस देण्याची राज्याची क्षमता आहे.
  • सध्या लसींची उपलब्धता नसल्याने दि. १ मे पासून १८ ते ४४ वयोगाटीतल लसीकरणाला प्रारंभ होणार नाही. कोविन ॲपवर नोंदणी, तारीख आणि वेळ निश्चिती करूनच लस घेता येईल. थेट केंद्रावर जाऊन लस घेता येणार नसल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये. ही केंद्र कोरोना पसरविणारी ठरू नयेत यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन श्री.टोपे यांनी युवा वर्गाला केले आहे.
  • सध्या जेथे लसीकरण सुरू आहे त्या केंद्रांवर केवळ ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होईल. १८ ते ४४ वयोगटासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र असतील.
  • राज्यात आरोग्य विभागाच्या १३ हजार संस्था असून प्रत्येकी दिवसाला १०० डोस दिले तरी एका दिवसात १३ लाख लोकांचे लसीकरण होऊ शकते.
  • लस वाया जाण्याचे राज्याचे प्रमाण खूपच कमी आहे. ते राष्ट्रीय सरासरीच्या खूपच कमी असून योग्य प्रमाणात लस वापरणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना त्याचे श्रेय जाते, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
  • राज्यात सध्या कोवॅक्सिन लस उपलब्धतेची टंचाई जाणवत असून ही लस बनविणाऱ्या कंपनीने सध्या १० लाख लस देण्याचे मान्य करतानाच जुलै, ऑगस्टमध्ये दरमहा २० लाख लस देऊ शकतो असे पत्र दिले आहे.
  • कोविशिल्ड लस प्रति महिना १ कोटी डोस मिळू शकतात असे त्या कंपनीने तोंडी कळविले असून दोन्ही लसींच्या उपलब्धतेनुसार प्रमाण ठरवून त्या दिल्या जातील.
  • रशीयन लस स्पुटनिक बाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात येत आहे. ही लस योग्य दरात आणि प्रमाणात मिळाली तर त्याचाही अंतर्भाव केला जाईल. ऑगस्ट, सप्टेंबर दरम्यान झायडस कॅडीला आणि जॉन्सन ॲण्ड जॉन्सन या दोन कंपन्यांच्या लसीचा पुरवठा होऊ शकतो, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
  • ज्येष्ठ मंत्र्यांची समिती १८ ते ४४ वयोगटाच्या नागरिकांच्या लसीकरणासाठी सूक्ष्म नियोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24