अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:- राज्यात लॉकडाऊनच्या दृष्टीने तयारीला लागा, अशा सूचना काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेनंतर भाजप आणि मनसेनं सरकारवर जोरदार निशाणा साधला.
गरीब आणि सर्वसामान्य लोकांना आता लॉकडाऊन परवडणार नाही, असं म्हणत या दोन्ही पक्षांनी लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतली आहे. लॉकडाऊनवरून राज्य सरकारवर सध्या टीकेची झोड उठली आहे.
या पार्श्वभूमीवर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सरकारची भूमिका मांडत लॉकडाऊनबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ‘लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, याची चिंता राज्य सरकारला आहे.
ही रुग्णसंख्या रोखण्यासाठी जे करणं गरजेचं आहे ते सगळं राज्य सरकार करत आहे. संसाधनांची कमी पडू दिली जात नाही. कोरोना संख्येच्या वाढत्या गतीपुढे आपली संसाधनं कमी पडतील अशी मला शंका वाटते आहे.
लॉकडाऊनची कोणालाही हौस नाही. पण आपली संसाधनं जर वाढत्या रुग्णांच्या पुढे कमी पडत असतील तर लॉकडाऊन करावा लागतो,’ अशी प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली आहे. लॉकडाउन हा शेवटी विचार करुन निर्णय घेण्याचा विषय आहे.
जसं निर्बंध कडक करायचे असतील तर कसे करायचे, उद्योगांना हात लावू नये, स्थलांतरित मजुरांचा मुद्दा उपसिथ्त झालेल्या क्षेत्राला हात लावू नये वैगेरे अशा अनेक गोष्टींचा अभ्यास होत असतो. त्या अभ्यासातून , परिस्थितीवर नजर ठेवून नंतर निर्णय घेतला जात असतो.
त्यामुळे तात्काळ लॉकडाउनचा निर्णय घेला जात नाही. निर्बंध कडक करत जावं लागतं,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं. “रुग्णसंख्या वाढणं चिंतेचा विषय आहे. लोकांचा प्रतिसाद मिळाला पाहिजे. लोकांचा निर्धास्तपणा हा त्याचं मुख्य कारण आहे.
कोणत्याही परिस्थितीत जे निर्बंध सांगितले आहेत ते पाळले जावेत अशी सरकारला जनतेकडून अपेक्षा आहे.
लग्नाला गर्दी करु नका, विनाकारण गर्दी करु नका, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग गोष्टींचं पालन केलं पाहिजे,” असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे..