अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- सकाळच्या व्यायामाने शरीरातील एन्डॉर्फिन्स जास्त स्रवलात आणि दिवसभर एक सकारात्मक आनंदी भावना जागृत राहते. व्यायाम कधी करावा असा अनेकांना पडलेला प्रश्न असतो.
व्यायाम केव्हा करावा यामागेदेखील एक विज्ञान आहे त्याची माहिती असायला हवी. आपल्या कामाच्या वेळा लक्षात घेऊन शरीराचे जैविक घड्याळ कशा पद्धतीने काम करते आहे, यावर व्यायामाची वेळ ठरवावी.
तुमची झोपण्याची सवय, तुमच्या कामाच्या किंवा शाळा-कॉलेजच्या वेळा यावर या वेळा अवलंबून राहतील. याचाच अर्थ तुम्ही रात्री जागत असाल, तर पहाटे उठण्यापेक्षा संध्याकाळची वेळ व्यायाम योग्य ठरेल.
पण तुम्ही रात्री लवकर झोपत असाल तर साहजिकच सकाळची वेळ सोयीची वाटेल. जैविक घड्याळाशी आपला व्यायाम निगडित ठेवण्याचा फायदा म्हणजे तुम्ही व्यायामाची ती ठराविक वेळ कायमस्वरूपी पाळू शकता.
सकाळच्या व्यायामाचे मात्र तुलनेने जास्त फायदे आहेत. जगभरातील सर्वेक्षणात असे सिद्ध झाले आहे, की जे लोक सकाळी सूर्योदयापूर्वी उठून व्यायाम करतात, ते व्यायामाची ही चांगली सवय दीर्घकाळ आणि कायमस्वरूपी टिकवू शकतात. पहाटे शक्यतो कुठल्याही कामाचे ओझे नसते.
त्यामुळे ती वेळ नक्की मोकळी मिळते. सकाळी योग्य प्रमाणात व्यायाम केल्यावर, शरीरातील स्नायूंना, हृदयाला आणि मेंदूला प्राणवायू जास्त मिळून जो ताजेतवानेपणा येतो, तो दिवसभर टिकतो.
सकाळच्या व्यायामाने शरीरातील एन्डॉर्फिन्स जास्त स्रवतात आणि दिवसभर एक सकारात्मक आनंदी भावना जागृत राहते. सकाळच्या व्यायामाच्या सवयीने रात्री वेळेवर झोप येते आणि जागरणे करत टीव्ही बघणे, उशिरापर्यंत पार्ट्या करणे,
गप्पा मारत किंवा टाइमपास करत संगणक किंवा मोबाइलवरील खेळ खेळत बसणे, अशा सवयी दूर पळून जातात. सकाळी शरीरातील ग्लायकोजेन पातळी कमी असल्याने,
व्यायामाने शरीरावरील चरबी जास्त सहजपणे वितळते आणि वजन जलदरीत्या कमी होऊ लागते. मात्र सकाळी शरीराचे तापमान कमी राहत असल्याने, व्यायाम करण्यापूर्वी वॉर्मअप करायला विसरू नये.