अहमदनगर Live24 टीम, 10 ऑक्टोबर 2021 :- राज्यासह नगर जिल्ह्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे. यातच अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे अनेक दुर्घटना देखील घडल्या.
तसेच या परतीच्या पावसाने मात्र बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणले आहे. जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वाघवाडी (ढवळपुरी) परिसरात गारपिटीसह वादळी पाऊस झाल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. यातच जोरदार वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर अनेक शेतकऱ्यांचे ऊस, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
प्रशासनाच्या वतीने तातडीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. परतीच्या पावसाने काही ठिकाणी नुकसान झाली असली तरी अद्याप भाळवणी परिसरातील काही गावांमध्ये मोठ्या पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.