अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात पावसाला दमदार सुरुवात झाली आहे. 12 तारखेला पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे.
चातकाप्रमाणे शेतकरी वर्ग पावसाची आतुरतेने वाट पाहत होता. अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश भागाला जोरदार पावसानं झोडपलं आहे. दमदार पाऊस झाला असून जोरदार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलं.
नगर शहरातही अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते आणि दुपारी पावसाला सुरुवात झाली.
उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी अचानक आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. या पावसाने शेतकरी वर्गात थोड्या फार प्रमाणात समाधान व्यक्त केलं जातंय.
अहमदनगर शहरातील नागरिकांना मात्र रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे आणि त्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.
नगर-कल्याण रोडवर तर अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिकांना वाहन चालवताना चांगलाच मनस्ताप होतोय. हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी आता तेथील नागरिक करताहेत.