अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- अनेक अडचणींचा सामना करीत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पशुपालन हा जोडधंदा उपयुक्त आहे. परंतु, अनेकदा साथरोग तसेच अन्य कारणांमुळे त्याच्याकडील महागडी जनावरे दगावतात. या नुकसानीमुळे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी हवालदिल होतो. या अडचणीच्या काळात त्याला काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणे आवश्यक असते.
ही बाब लक्षात घेवून जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात येते. यंदाच्या वर्षी जनावरे दगावल्याने नुकसान झालेल्या ६९ लाभार्थींना ४ लाख ९४ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. पुढील वर्षी यासाठीची तरतूद वाढवून शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्याचा प्रयत्न राहिल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले पाटील यांनी केले.
जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्यावतीने साथीचे रोग, विषबाधा, विजेचा धक्का बसणे अशा विविध कारणांमुळे जनावरे दगावलेल्या शेतकऱ्यांना सेस फंडातून भरपाई देण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत ६९ लाभार्थींना मदतीच्या धनादेशाचे वितरण अध्यक्षा घुले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सभापती गडाख यांनी सांगितले की, शेतकऱ्यांसाठी पशुधन हे अतिशय मोलाचे असते. गायी,म्हशी, शेळ्या मेंढ्यापालनातून त्याला काही प्रमाणात उत्पन्न मिळते. मात्र अनेकवेळा साथीच्या आजारामुळे किंवा अन्य कारणांमुळे हे पशुधन दगावल्यास त्याच्यापुढे मोठा प्रश्न निर्माण होतो.
यासाठीच नगर जिल्हा परिषदेने सेस फंडातून अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात दिला जातो. अशी योजना राबविणारी नगर जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात डॉ.तुंबारे यांनी सांगितले की, पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांकडील पशुधनासाठी अनेक योजना राबविण्यात येतात.
असे असले तरी अनेकवेळा साथीचे आजार पसरल्यास वेळीच उपचार न मिळाल्याने जनावरे दगावतात. यासाठी सेस फंडातून शेतकऱ्यांना मदत केली जाते. यात मोठ्या जनावरासाठी ५ हजार, लहान जनावरे वासरे, पारडी, शेळया मेंढ्यांसाठी एक हजार रुपये अशी नुकसानभरपाई दिली जाते.