अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- आजवर आपण एखाद्या गुन्हेगारास घेऊन जात असताना अचानक त्या पोलिसांच्या वाहनावर इतर काही जण गोळीबार करून एकतर त्या आरोपीची सुटका करतात किंवा त्याला देखील ठार मारतात.
हे दृश्य आपण सिनेमात पाहिले आहे. मात्र अगदी सिनेमात असतो असाच प्रकार नगर शहरात घडला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, भिंगार ठाण्याचे पोलीस एका फरार आरोपीला ताब्यात घेऊन जात होते.
पोलिसांचे वाहनशहरातील भिंगार नाल्याजवळ आले असता अचानक इतर पाच आरोपींनी पोलिसांचे वाहन अडवले व या सर्वांनी पोलिस घेऊन जात असलेल्या आरोपीवर प्राणघातक हल्ला केला.
यात सादिक लाडलेसाहब बिराजदार (वय 32 रा. मुकुंदनगर) असे जखमी झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी सादिक याची पत्नी रुक्सार बिराजदार हिने दिलेल्या फिर्यादीवरून मुनीया उर्फ अजीम रसुल सय्यद, रशीद रसुल सय्यद, कुददुस रशीद सय्यद,
मोईन मुनीया उर्फ अजीम सय्यद, अर्शद मुनीया उर्फ अजीम सय्यद सर्व रा. दर्गादायरा (रा. दर्गादायरा, मुकुंदनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या हल्ल्यात जखमी झालेला सादिक याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नगरमध्ये अशी घटना प्रथमच घडली आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.