त्यांचे महाराष्ट्राबाहेर लक्ष आहे. कोरोना काळात त्यांनी राजकीय अभिनिवेश सोडावा…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-भाजपच्या शिष्टमंडळाने लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देण्याची मागणी करीत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना काल गुरुवार रोजी विविध मागण्यांचे निवेदन दिले.

तसेच जिल्ह्यात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी भाजपाचे नेते आमदार बबनराव पाचपुते, माजी मंत्री तथा जिल्हा सहकारी बॅंकेचे

जेष्ठ संचालक शिवाजीराव कर्डिले, भाजपा शहराध्यक्ष भैय्या गंधे, भाजपाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, जिल्हा उपाध्यक्ष रवी सुरवसे आदी उपस्थित होते.

कोरोना जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणाऱ्या लोकांना जीवन जगणे कठीण होत आहे. सध्या शासनाच्या धोरणानुसार अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू आहेत, मात्र नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे.

रोजंदारीवर काम करणाऱ्या छोट्या घटकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून त्यांना दिलासा देण्यात यावा. सरकारने जाहीर केलेल्या मदतीपासून अनेक छोटे घटक दुर्लक्षित राहिले आहेत, त्यांनाही मदत मिळावी.

आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करून हॉस्पिटल व मेडिकलवर नियंत्रण आणावे. जेणेकरून सर्वसामान्यांना उपचार घेणे सोयीचे होईल. तसेच रेडमीसिवीर हे इंजेक्शन व ऑक्सिजन पुरवठा वाढविण्यात यावा.

रुग्णालयाच्या बिलासंदर्भात शासकीय दराप्रमाणे बिल आकारण्यात यावी. त्याचे दरपत्रक प्रसिद्ध करण्यात यावे. प्रत्येक तालुक्यात ५०० बेडचे कोविड सेंटर सुरू करावे. त्यापैकी किमान शंभर बेड ऑक्सिजन सुविधेसह असावेत.

खाजगी हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्यांची होणारी लूट थांबविण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करून त्यांचे मोबाईल नंबर सार्वत्रिक करावेत. यासोबतच जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी.

जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत शिष्टमंडळातील शिंदे, कर्डिले, पाचपुते, मुंढे, गंधे यांनी अनेक बाबींकडे लक्ष वेधले. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्याची ग्वाही दिली.

दरम्यान, कर्जत जामखेडच्या लोकप्रतिनिधींचे लक्ष मतदार संघ, जिल्हा आणि राज्यातील परिस्थितीकडे नाही. त्यांचे महाराष्ट्राबाहेर लक्ष आहे. कोरोना काळात त्यांनी राजकीय अभिनिवेश सोडावा. कुकडीचे आवर्तन सुटण्यास विलंब होतो आहे.

लाभक्षेत्रातील फळबागा उध्वस्त होतील. परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. मात्र, याकडे त्यांचे लक्ष नाही, या शब्दात माजी मंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवारांवर नामोल्लेख टाळून निशाणा साधला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24