अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- कुद जाऊंगा मर जाऊंगा असे ऐकले कि प्रत्येकाच्या डोळ्यासमोर शोले सिनेमाचा तो सिन लगेच उभा राहतो. असेच एक शोले स्टाईल आंदोलन राजगुरूनगर मध्ये झाले आहे. मात्र हे आंदोलन बसंतीसाठी नव्हे तर लाखोंचा पोशिंदा बळीराजासाठी करण्यात आले होते.
जगलो तर तुमचा, नाही तर शेतकऱ्यांचा’ अशी भावना आपल्या पत्नीकडे व्यक्त करीत रिंगरोड आणि पुणे-नाशिक रेल्वे विरोधी कृती समितीचे अध्यक्ष पाटीलबुवा गवारी यांनी दोन्ही प्रकल्पांच्या विरोधात राजगुरूनगर येथील प्रांत कार्यालयासमोरील पाण्याच्या उंच टाकीवर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
या ‘शोले स्टाइल’ आंदोलनामुळे प्रशासन मात्र खडबडून जागे झाले. जोपर्यंत प्रांताधिकारी घटनास्थळी येत नाही, शासनाची भूमिका स्पष्ट करीत नाहीत तोपर्यंत खाली येणार नाही. कोणी अडवण्याचा प्रयत्न केला आणि अधिकारी आले नाहीत तर आत्महत्या करण्याचा पवित्रा घेतला.
प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, पोलीस उपअधीक्षक अनिल लंभाते यांनी प्रयत्न करूनही पाटील गवारी यांनी त्यांचे टाकीवरील ‘शोले स्टाइल’ आंदोलन सुरू ठेवले.
गवारी यांच्यासह आंदोलकांवर कोणताही गुन्हा दाखल न करण्याचा आश्वासनानंतर काही कार्यकर्ते टाकीवर गेले. तेथे त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर त्यांना पकडून टाकीवरून खाली आणण्यात आल्यानंतर या ‘शोले स्टाइल’चा शेवट झाला.