अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- देशभरासह राज्यात परत एकादा कोरोनाने डोके वर काढले आहे. रोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. मात्र शहरातील अनेक मंगल कार्यालये गर्दीने ओसंडून वाहत आहेत.
आता प्रशासनाने नव्या नियमावलीचा बडगा उगारला गेला आहे. कारण लग्न समारंभाची धूम सुरू असून त्याला अटकाव करण्याची जबाबदारी ही मंगल कार्यालयांची आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी विविध मंगल कार्यालयांना अचानक भेटी देऊन पाहणी केली असता, तीन ठिकाणी प्रमाणापेक्षा अधिक गर्दी केल्याचे आढळून आले.
संबंधित मंगलकार्यालय चालकांना प्रत्येकी ५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत, त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, तसे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी नुकतेच दिले आहेत. तरी ते गांभीर्याने घेतले जात नाहीत.
त्यामुळे काल दुपारी अचानक वसंत टेकडी येथील सिटी लॉन व ताज गार्डन आणि आशीर्वाद मंगल कार्यालयांवर जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. तेव्हा सोशल डिस्टंसचे उल्लंघन, मास्क नसणे आदी बाबी दिसून आल्या. त्यामुळे सरसकट दंड आकारून कार्यालय चालकांना दणका दिला. त्यामुळे वऱ्हाडी मंडळींना धाक बसला आहे.