Maharashtra News : मराठा समाजात अनेक कुटुंबांची अर्थव्यवस्था अत्यंत कठीण असून त्यांच्या आरक्षणाला इतर समाजाचाही पाठिंबा आहे. या आरक्षणासाठी सरकारने लवकरात लवकर लक्ष घातले पाहिजे. यासाठी विशेष अधिवेशन घ्यावे, अशी आग्रही मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा माजी प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
मराठा आरक्षणाविषयी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत माध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले की, मराठा आरक्षण मिळावे, ही जनभावना आहेत. मराठा समाजात अनेक कुटुंबांची अर्थव्यवस्था अत्यंत कठीण आहे.
या समाजातील तरुणांचा रोजगारीचा प्रश्न वाढला आहे. त्यामुळे आरक्षणाच्या माध्यमातून रोजगार मिळेल, अशी अपेक्षा तरुणाना असणे सहाजिक आहे. आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला इतर समाजाचाही पाठिंबा आहे. त्यामुळे सगळ्या भावनांचा विचार करून सरकारने याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे.
याबाबत विशेष अधिवेशन बोलून आरक्षणाबाबत ज्या काही पूर्तता करायचे असतील त्या पूर्ण करून लवकरात लवकर आरक्षण द्यावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेबाबत बोलताना ते म्हणाले की,
पंतप्रधान मोदी यांनी एका सभेमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांना गुरु म्हटले होते. मग गुरुवर टीका कशी काय करू शकतात? आणि खा. शरद पवार यांचे कृषी क्षेत्रातील आणि शेतकऱ्यांसाठी खूप योगदान दिलेलं आहे.
देशाचे राजकारण आणि समाजकारणात त्यांचे मोठे योगदान आहे. आणि काहीही टीका केली, तरी त्यांचे देशाच्या राजकारणात व समाजकारणात आणि शेतकऱ्यांसाठी खूप मोठे योगदान आहे, हे सर्वांच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
तर आपण निळवंडेसाठी पुनर्वसनाचा प्रश्न सोडवून अनेक अडचणीवर मात करून धरण पूर्ण केले. कालव्यांची कामे पूर्ण करून आता पाणी आले. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आल्याचे मोठे समाधान आहे.
त्यामुळे उद्घाटन कोणी केले हा प्रश्न येत नसून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी येऊन त्यांच्या जीवनात आनंद निर्माण झाल्याने आपल्या कामाचे सार्थक झाल्याचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.