अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-येत्या काळात पोलीस अधिकाऱ्यांची कुणाची निष्ठा काय आहे, कोणावर आहे हे तपासून पाहिलं जाईल. योग्य ती माहिती घेतली जाईल आणि त्यावर निर्णय घेतला जाईल.
सध्याचा काळ अवघड आणि चॅलेंजिंग आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे नूतन गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनी दिली.
वळसे पाटील यांनी मंगळवारी राज्याच्या गृहमंत्रिपदाची सुत्रे हाती घेतली. त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
ते म्हणाले, प्रशासकीय कामात कोणताही हस्तक्षेप न करता मला देण्यात आलेली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करेन, अशी त्यांनी दिले.
आता पुढचे काही दिवस सण उत्सवाचे आहेत. गुढीपाडवा, रामनवमी, आंबेडकर जयंती, रमजानसारखे सण आहेत.
प्रत्येक धर्मीयांच्या दृष्टीने हे महत्वाचे दिवस आहेत त्यामुळे या महिन्यात आपल्यासमोर आणखी चॅलेंजिग परिस्थिती असणार आहे,’ असे वळसे पाटील म्हणाले.
आधीचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परवीर सिंह यांनीच आरोप केले होते.
त्या आरोपांच्या चौकशीमुळं देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. परवीर सिंह यांचे भाजपशी संबंध असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला होता.
त्यामुळे वळसे पाटील यांचे राजकीय निष्ठा बाळगणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांबाबतच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.