अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-राहाता तालुक्यातही कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अनेक नागरिक या कोरोना महामारीच्या भितीपोटी लक्षणे असताना देखील डॉक्टरांचा सल्ला न घेता घरगुती उपचार करत आहे.
त्यामुळे रुग्ण गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात दाखल होत असल्याने ऑक्सिजन व बेड मिळविण्यासाठी नातेवाईकांची धावाधाव होत आहे.
नागरिकांनी वेळीच प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी असे आवाहन डॉ.सोमनाथ गोरे यांनी पत्रावद्वारे केले आहे.
डॉ.गोरे पुढे म्हणाले,जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असून हॉस्पिटलमध्ये बेड,ऑक्सिजन मिळत नसल्याने रुग्णांची व नातेवाईकांची फरफट होत आहे. प्रशासनाकडून अनेक वेळा कोरोनाच्या प्रादुभार्वासंदर्भात जनजागृती केली जात आहे.
तरीही नागरिक गांभीर्याने घेत नसल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये,
यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी गावचे सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी व इतर गावातील सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या वार्डामध्ये लक्ष दिले तरी हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवू शकतो.
शासनाने वेळोवेळी दिलेले नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यात कोरोनाची लक्षणे बदललेली असून याचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे.
मात्र, काही नागरिक कोरोनाची लक्षणे जाणवत असली तरी घरच्या घरीच उपचार घेत आहे. त्यामुळे या आजार पसरण्याची भिती आहे, त्यामुळे नागरिकांनी घरीच उपचार न करता रुग्णालयात जावून तपासणी करावी, असे आवाहन डॉ.गोरे यांनी केले आहे.