अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- जिल्ह्यात दरदिवशी चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. रात्रीच्या अंधारात होणाऱ्या चोऱ्या आता दिवसाढवळ्या होऊ लागल्या आहेत. घरे, दुकाने शोरूम आदीनंतर आता चोरट्यांची नजर दवाखान्यांवर पडली आहे.
नुकतेच राहुरीमध्ये रुग्णालयात चोरी झाल्याची घटना घडली आहे. राहुरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत ठेवण्यात आलेले वैद्यकीय साहित्य, एक्सरे मशीन चोरीस गेले आहे.
याबाबत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊनही गुन्हा दाखल झालेला नसल्याचे पुढे आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीची दुरवस्था झाल्याने, वैद्यकीय सेवा ठप्प होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. ग्रामीण रुग्णालयाचे २ नोव्हेंबर, २०१७ रोजी पालिकेच्या अभ्यासिका इमारतीत स्थलांतर झाले.
त्यावेळी जुन्या इमारतीमधील जे वैद्यकीय साहित्य हलविणे शक्य नव्हते, ते सुरक्षितपणे एका खोलीत ठेवण्यात आले होते. त्यामुळे या साहित्याकडे दुर्लक्ष झाले. या साहित्याच्या संरक्षणासाठी काहीही यंत्रणा नाही.
नव्या इमारतीत ग्रामीण रुग्णालयाचा कारभार सुरू झाल्याने जुन्या इमारतीकडे कर्मचारी अभावानेच जातात.