कोरोना महामारीत योगदान देणार्‍या महिलांचा सन्मान

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- जागतिक महिला दिनानिमित्त निमगाव वाघा (ता.नगर) येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने कोरोना महामारीत योगदान देणार्‍या आरोग्य सेविका, अंगणवाडी कर्मचारी यांच्यासह महिला सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत महिला सदस्यांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला.

तर कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी ग्रामस्थांना प्रतिबंधात्मकतेच्या उपाययोजनांची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. या महिलांचा सन्मान सोहळा कार्यक्रमात निमगाव वाघा आरोग्य उपक्रेंद्राचे डॉ. शंतनू शिंदे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सचिन कळमकर, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, माजी सरपंच साहेबराव बोडखे, अनिल डोंगरे,

भागचंद जाधव, डॉ. विजय जाधव, उद्योजक दिलावर शेख, आरोग्यसेवक निलेश हराळ, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, महेश वाघुले, अतुल फलके, डोंगरे संस्थेच्या सचिव मंदाताई डोंगरे, रंगनाथ शिंदे, पिंटू जाधव आदी उपस्थित होते.

पै.नाना डोंगरे म्हणाले की, घराला घरपण व कुटुंबाला आधार देणारी ही एक स्त्रीच असते. कोरोना काळात मोठ्या धाडसाने महिला डॉक्टर, आरोग्यसेविका, परिचारिका व अंगणवाडी कर्मचारी यांनी महत्त्वाचे योगदान दिल्याने अनेकांचे जीव वाचविता आले. या महामारीत सर्वांनी आपल्या परीने योगदान देऊन कार्य केले. प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर असून, समाज परिवर्तनासाठी महिलांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात सरपंच रुपाली जाधव, उपसरपंच अलका गायकवाड, ग्रामपंचायत सदस्या मुन्नाबी शेख, आरोग्य सेविका सलिमा पठाण, आशा सेविका संगीता आतकर, अर्चना काळे, अलका कैतके, अंगणवाडी सेविका सविता फलके, सारिका शिंदे, नंदा जाधव, पुष्पा फलके, सिमा फलके, कविता कापसे, मदतनीस रेखा ठोंबरे या महिलांचा उपस्थितांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

डॉ. शंतनू शिंदे व डॉ. सचिन कळमकर यांनी उपस्थित ग्रामस्थांना सदृढ व निरोगी आरोग्यासंबंधी मार्गदर्शन करुन, कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी करण्यात येणार्‍या उपाययोजनांची माहिती दिली. कोरोना प्रतिबंधात्मकतेचे नियम पाळून गावात हा कार्यक्रम पार पडला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24