गुंड कर्डीलेस बसस्थानकावर पकडले !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:- पारनेर तालुक्यातील कुरूंद ग्रामपंचायतीच्या निवडणूकीतील पराभूत उमेेदवार जयवंत नरवडे यांच्यावर काठया तसेच तलवारीने हल्ला करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी फरार असलेला अविनाश नीलेश कर्डीले यास पारनेर पोलिसांनी शनिवारी दुपारी तिन वाजण्याच्या सुमारास पारनेर बसस्थानकावर अटक केली.

रविवारी त्यास पारनेरच्या न्यायालयापुढे उभे करण्यात आले, त्यावेळी न्यायालयाने त्यास ९ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. कुरूंद ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत कुख्यात गुंड अमोल कर्डीले याचा चुलता अनिल कडीले याच्या विरोधात जयवंत नरवडे यांनी निवडणूक लढविली होती. नरवडे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर अमोल कर्डीले तसेच इतर तरूणांनी नरवडे यांना धमकावत अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणला होता.

मात्र दबाव झुगारून नरवडे यांनी निवडणूक लढविली. निवडणूकीत मात्र नरवडे यांचा पराभव झाला तर अनिल कर्डीले विजयी झाला. निकालानंतर गुंड अमोल याने चुलता अनिल कर्डीलेसह सागर भाउसाहेब कर्डीले, विवेक अरूण कर्डीले, अविनाश नीलेश कर्डीले, राजू शेळके, राजेंद्र साहेबराव कडीले, पंकज अनिल कर्डीले, सुहास थोरात, आकाश नीलेश कर्डीले व रमेश महादू नरवडे यांच्यासह जयवंत नरवडे यांच्या घरी जाउन घराबाहेेर आढून काठया तसेच तलवारीने त्यांच्यावर हल्ला केला होता.

त्यात नरवडे हे गंभीर जखमी झाले होते. नरवडे यांना मारहाण करू नका असे अर्जव करीत मध्यस्ती करण्यासाठी गेलेल्या नरवडे यांच्या सुनेच्या डोक्याला अविनाश कर्डीले याने रिव्हॉल्व्हर लाउन गोळया घालण्याची धमकी दिली होती. घटनेनंतर सर्व आरोपी पसार झाले. घटना घडली त्याच रात्री नीलेश कर्डीले तसेच रमेश कर्डीले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्यानंतर काही दिवसानंतर विवेक कर्डीले तसेच एका अल्पवयीन आरोपीस पारगांव (ता. शिरूर जि. पुणे) येथील हॉटेलमधून ताब्यात घेतले. अमोल, अनिल कर्डीले यांच्यासह इतर आरोपी शिरूर जि. पुणे परीसरात असल्याची माहीती समजल्यानंतर पो. नि. घनश्याम बळप, उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे, कर्मचारी भालचंद्र दिवटे, सत्यम शिंदे, दत्ता चौगुले यांच्या पथकाने चव्हाणवाडी फाटा, ता शिरूर येथे दारूची पार्टी करीत असलेल्या अमोल कर्डीले यास ताब्यात घेतले.

त्यास न्यायालयाने दोनदा पोलिस कोठडी देऊन न्यायालयीन कोठडीत रवाणगी केल्यानंतर शिरूर जि. पुणे येथील पोलिसांनी त्यास खुनाच्या प्रयत्नाच्या दुसऱ्या गुन्हयात ताब्यात घेतले. त्यामुळे सध्या कुख्यात गुंड अमोल कर्डीले हा शिरूर पोलिसांच्या ताब्यात आहे. तर अटक करण्यात आलेले चार आरोपी पारनेर न्यायालयीन व पोलिस कोठडीत आहेत. जखमी नरवडे यांच्या सुनेच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लाऊन गोळया घालण्याची धमकी देणारा अविनाश कर्डीले हा मात्र फरार होता.

पोेलिस त्याच्या मागावर असताना तो शिरूर येथून पारनेर येथे एस टी बसने येत असल्याची माहीती पारनेर पोलिसांना समजली. त्यांनी पारनेर बसस्थानकावर सापळा लाऊन तो शिरूर बसमधून उतरताच पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. रविवारी त्यास पारनेरच्या न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्यास मंगळवारपर्यंंत पोलिस कोठडी दिली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24