अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी वेळेत मिळण्यासाठी आपण नियोजनात कोठेही कसर ठेवणार नाही. घोड खालील शेतकऱ्यांची मागणी होती, पाणी लवकर सुटावे.
त्यानुसार संबंधित मंत्री महोदयांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनुसार घोड आवर्तन २७ मार्च रोजी पासून सोडण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री व विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली आहे.
या संदर्भात बोलताना श्री. पाचपुते म्हणाले,घोड धरणातून शेतीसाठी आवर्तन दि २७ मार्च 2021 रोजी पासून सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
सोडण्यात येणा-या पाण्याचा अपव्यय टाळून शेतक-यांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे व पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांना सहकार्य करावे असे आवाहन पाचपुते यांनी करून घोड च्या नियोजना अभावी मागे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला होता.
त्यामुळे येथून पुढे आगामी काळात योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी सांगितले.