अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :-करोना संसर्ग वाढल्याने जिल्ह्यात खासगी हॉस्पिटलमध्ये करोनावर उपचार घेण्यासाठी रुग्णाच्या रागांच्या रांगा लागलेल्या दिसून येत आहे.
अशा महामारीच्या काळात जे खासगी हॉस्पिटल रुग्णांना शासकीय नियमाप्रमाणे बिल आकारून सेवा देत आहेत
त्यांचा तालुका दक्षता समितीने सन्मान करावा. तर दुसरीकडे शासकीय नियम बाजूला सारून अवाच्या सव्वा बिल घेणार्या खासगी हॉस्पिटलवर कडक कारवाई करावी.
त्यामुळे इतर अवाच्या सव्वा फी घेणार्या खासगी हॉस्पिटलला चपराक बसेल, अशी मागणी तहसीलदारांकडे केली आहे. जिल्ह्यात करोना संसर्गाचा वेग गेल्या आठ दिवसांपासून वाढल्याने जिल्ह्यातील रुग्णाचे प्रमाण अधिक वाढले आहे.
करोना आजारावर उपचार घेण्यासाठी शासकीय हॉस्पिटल व खासगी हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नसल्याने रुग्ण व नातेवाईकांना वेळेत उपचार मिळत नसल्याने मोठ्या मानसिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
हे सर्व चालू असताना शिर्डी परिसरातील काही खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलेल्या रुग्णांकडून अवाच्या सव्वा बिलाची मागणी होताना दिसत आहे.
राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी खासगी हॉस्पिटलने सरकारी दराप्रमाणे बिले आकारून करोना रुग्णाला उपचार द्यावे असे आदेश असतानाही तहसीलदाराचे आदेश जणू खासगी हॉस्पिटलने जुगारून लावल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
याबाबत करोना दक्षता समिती यांनी संबंधित हॉस्पिटलची पाहणी करणे आवश्यक आहे. करोना आजार हा बरा होणारा आजार असल्याने वेळेत उपचार घेऊन रुग्ण बराही होतो. मात्र सर्वसामान्य माणूस या आजाराच्या बिलामुळे त्रस्त झाला आहे.
तरी राहाता तालुका शासकीय दक्षता समितीने यात त्वरित लक्ष घालून संबंधित रुग्ण व नातेवाईकांना न्याय द्यावा, अशी मागणी भारतीय लहुजी सेनेच्यावतीने प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.