अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरविण्यात प्रशासन हतबल होत आहे, यातच बेड पाठोपाठ जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे.
यामुळे अनेक रुग्णांचे जीव टांगणीला लागले आहे. यातच जिल्ह्यातील उत्तरेकडीन अनेक तालुक्यांमध्ये ऑक्सिजनचा साठा काही तास पुरेल इतकाच शिल्लक असल्याने आरोग्य विभाग देखील चिंताग्रस्त झाले आहे.
दरम्यान शिर्डी, कोपरगाव, राहाता येथे संगमनेर येथून ऑक्सीजन सिलींडरचा पुरवठा होतो. कोपरगावला दोन सब एजन्सी असुन त्यांना सिन्नर, संगमनेरमधून पुरवठा होतो. मात्र गेल्या तीन दिवसांपासून हा पुरवठा थांबवण्यात आला आहे.
संगमनेर येथील रूग्णालयांनाही पुरेसा ऑक्सीजन मिळेनासा झाल्याने संगमनेरकरांनी बाहेर ऑक्सीजन देणे थांबवले आहे. यामुळे कोपरगाव व राहाता तालुक्यातील रूग्णालयेच व्हेंटीलेटरवर गेली आहेत.
यातील काही रूग्णांलयाकडे सायंकाळपर्यत तर काहींकडे रात्रीपर्यंत पुरेल इतकाच ऑक्सीजन शिल्लक आहे. ऑक्सीजन पुरवठा थांबल्याने शिर्डी, राहाता व कोपरगावातील रूग्णालयांनी ऑक्सीजन आवश्यक असणारे पेशंट अॅडमीट करून घेणे थांबवले आहे.
तर अन्य रूग्णांना इतरत्र हलवण्याच्या सुचना रूग्णालयांनी नातेवाईकांना दिल्या आहेत. मात्र गंभीर रूग्णांच्या उपचाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान ऑक्सीजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
संगमनेरच्या पुरवठादाराने नकार दिला आहे. औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला आहे. ते 50 सिलींडर देणार आहेत. काही दिवस रोज पुरवठा करण्याबाबत त्यांना विनंती केली आहे. अशी माहिती प्रांताधिकार गोविंद शिंदे यांनी दिली आहे.