अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-कोरोना संसर्ग तसेच लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका हॉटेल क्षेत्राला बसला असून, आता पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या चर्चेमुळे या क्षेत्रात परत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांत अंशत: टाळेंबदी केली आहे. पुणे, नागपूर आणि औरंगाबाद यासारख्या काही शहरांमध्ये हॉटेल आणि रेस्टॉरंटवर वेळेचे निर्बंध आल्याने आता पुन्हा एकदा व्यवसायाला झळ बसण्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
मागील वर्षी टाळेबंदीमुळे या क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांना प्रचंड संघर्ष करावा लागला. भविष्यातील टाळेबंदी या क्षेत्राचा घास घेईल,
अशी भावना हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया ने व्यक्त केली असून, कोणताही कडक निर्णय घेण्यापूर्वी राज्य सरकारने व्यवहारिक बाजूने विचार करावा, असे आवाहन केले आहे.
एचआरएडब्ल्यू आयचे अध्यक्ष शेरी भाटिया म्हणाले की, विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या पाहिजेत, ही बाब नाकारून चालणार नाही. ही इंडस्ट्री शासनाच्या प्रतिबंधात्मक उद्दिष्टासोबतच आहे.
मात्र, या अकल्पित टाळेबंदीचा पहिला बळी कायमच हॉटेल तसेच रेस्टॉरंट क्षेत्र ठरत आल्याने सध्या आम्हाला चिंतेने ग्रासले आहे. मॉल, शॉपिंग सेंटर्स, किराणा दुकाने, सार्वजनिक वाहतूक अगदी विमानतळांच्या तुलनेतही हॉटेल व रेस्टॉरंट सुरक्षित जागा आहे.
येथे जागेचे व्यवस्थापन शक्य आहे. टेबल आणि खुर्च्यांची सोय सामाजिक अंतराचे भान राखूनच करण्यात येते. दरवेळी एन्ट्री आणि एक्झिीटच्या ठिकाणी व्यक्तींची देखरेख असते. अगदी अंतर्गत भागातही कर्मचारी वर्ग सर्व ती काटेकोर काळजी घेत असतो.
मागील वर्षी टाळेबंदीचा मोठा फटका या क्षेत्राने सहन केला. मात्र, या वेळी अंशत: टाळेबंदीतही हॉटेल व रेस्टॉरंट क्षेत्र तग धरू शकणार नाही. राज्य शासनाने घाईघाईने निर्णय घेऊन टाळेबंदी लादू नये, अशी विनंती देखील केली आहे.