अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- पारनेर तालुक्यात माजी आमदार वसंतराव झावरे यांच्या नावाने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात तेथे विश्वशांती महायज्ञ करण्यात आला. याबद्दल अंधश्रदधा निर्मूलन समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
यावरून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी सवाल उपस्थित केला आहे. करोनावर अद्याप औषध सापडलेले नाही. विज्ञानाला अध्यात्माची जोड देण्यासाठी आम्ही कोविड केअर सेंटरमध्ये विश्वशांती यज्ञ केला. त्यामध्ये कोणतही अंधश्रद्धा नाही.
तरीही अंनिसने तक्रार केली. मात्र, पारनेर तालुक्यातच काही कोविड सेंटरमध्येही वेगळे कार्यक्रम होत आहेत. नृत्यांगणाही नाचविल्या जात आहेत, ते कसे चालते, असा सवाल सुजित झावरे यांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणावर टीका होऊ लागल्याने झावरे यांनी पत्रकार परिषद घेतली.
त्यांनी सांगितले की, कोविड केअर सेंटरमध्ये महायज्ञ करणे ही अंधश्रद्धा नसून, तो एक श्रद्धेचा भाग आहे. या महायज्ञाचा कोणी चुकीचा अर्थ काढून आमच्या श्रद्धेला हात घालू नये. प्रार्थना करणे हा गुन्हा असेल तर मी गुन्हेगार आहे.
गाईच्या दुधापासून बनविलेले तूप व गोवरी जाळल्यामुळे त्यातून ऑक्सिजनच बाहेर पडतो, हे विज्ञान सांगते. त्यामुळे त्याचा धोका नाही. उलट करोना रुग्णांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला. असे असूनही अंनिसने जिल्हाधिकार्यांकडे महायज्ञबाबत तक्रार केलेली आहे.
मात्र, इतर सेंटरमध्ये प्रवचने, वेगवेगळे कार्यक्रम होतात. त्याबद्दल कोणीच का बोलत नाही?, असा सवाल झावरे यांनी विचारला आहे.
आम्ही यज्ञ केल्यावर कारवाईची मागणी होते. तर मग अशा इतर कोविड सेंटरबाबत अंनिस गप्प का आहे? यामागे काहीतरी राजकीय षड्यंत्र असल्याचा संशय येतो. असे झावरे म्हणाले आहे.