अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- नगर जिल्ह्यातील सर्वांत मोठे मुळा धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरण 56 टक्के भरले आहे. २६ हजार दलघफूट पाणीसाठवण क्षमतेच्या मुळा धरणाचा पाणीसाठा वाढतो आहे.
तसेच जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास हे धरण 100 टक्के भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाणलोटातील हरिश्चंद्र गड, पाचनई, आंबित व अन्य भागात आषाढ सरी अधूनमधून जोरदार बरसत असल्याने मुळा धरणात पाण्याची आवक होत आहे. या धरणातील पाणीसाठा56 टक्के झाला आहे.
मुळा धरणात गुरूवारी सकाळी 6260 क्युसेकने आवक होत होती. त्यानंतर सायंकाळी घट झाली. कोतूळ येथील मुळा नदीचा विसर्ग 504 क्युसेक होता. तर साठा 14435 दलघफू होता. रात्री उशीरा या साठ्यात वाढ होऊन तो 14550 दलघफू झाला होता.
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हरिश्चंद्रगडावर मागील काही दिवसांमध्ये दररोज कमी-अधिक प्रमाणात पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे धरणात नवीन पाणीसाठा जमा होत आहे.
धरणाच्या लाभक्षेत्रात काहीकाळ पावसाने विश्रांती देखील घेतली होती. दरम्यान पाणलोटात पाऊस असल्याने भात लागवड सुरू आहे. भातखाचारांमध्ये पाणी असल्याने ही पिके तरारली आहेत.