अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- ‘लखोबा लोखंडे’ या फेसबुक पेजवरून सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी कारवाईची मागणी केली होती.
त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. तसंच ‘मला पकडून दाखवल्यास 100 कोटी रुपयांचे बक्षीस देणार’ असं चॅलेंज देणाऱ्या अभिजीत लिमये याच्या पुणे सायबर क्राईमने मुसक्या आवळल्या. ‘लखोबा लोखंडे’ उर्फ अभिजित लिमये याला पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आणि काळं फासलं आहे.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या ‘लखोबा लोखंडे’वरुन भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केलीय. अभिजित लिमये याला सोडविण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी कॉल केला. मग त्याने जे लिखाण केल तेच फडणवीसांचं मत होतं का? असा सवाल रुपाली चाकणकर यांनी केलाय.
तसंच आयटी सेलला हाताशी घेऊन अशी कामं केली जात आहेत. याला सर्वस्वी जबाबदार भाजप आणि भाजपचे आयटी सेल असल्याचा आरोप चाकणकर यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आक्षेपार्ह लिखाण करणा लिमये याला त्याच्या मुंबईच्या माहिममधील त्याच्या सासरवाडीतून पोलिसांनी काल पुण्यात आणलं.
पुणे शहर शिवसेनेची वॉर रूम सांभाळणारा आदित्य चव्हाण याने ‘लखोबा लोखंडे’ची सर्व खोटी 7 फेसबुक अकाउंट हॅक केली. ती सर्व माहिती पोलिसांना सादर केल्यामुळेच तो सापडला. त्याला कोर्टात हजर केलं असता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
दरम्यान लिमये याला आज पुणे येथे न्यायालयात हजर करण्यासाठी आणले होते. यावेळी राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकाऱ्यांनी या अभिजित लिमयेच्या तोंडाला काळे फासत त्याच्याकडून पुन्हा असे करणार नाही, असं वदवून घेतले.