file photo

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण केले जात आहे. यातच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे मात या मोहिमेमध्ये काही अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.

जिल्ह्यात आता करोनाची मुबलक लस आहे. पण लस घेतल्यानंतर दिली जाणारी पॅरासिटामॉल या औषधाच्या गोळ्या व लस टोचण्यासाठी आवश्यक असणारी सिरिंजचा तुटवडा निर्माण झाला आहे.

राज्य सरकार व जिल्हा परिषदेच्या दुर्लक्षामुळे हे घडत असल्याचा आरोप जिल्हा परिषदेतील भाजपचे गट नेते जालिंदर वाकचौरे यांनी केला आहे. राज्यात सर्वाधिक करोनाचा प्रभाव सध्या नगर जिल्ह्यात आहे.

असे असताना लसीकरणासाठी आवश्यक असणारी सिरींजचा तुटवडा निर्माण झालेला असताना त्याकडे राज्य शासनाचे व जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष झालेले आहे. एकीकडे केंद्र सरकार लस उपलब्ध करून देते, परंतु जिल्ह्यात मात्र राज्य सरकार व जिल्हा परिषद दुर्लक्ष करत आहे.

१४ वा वित्त आयोगाच्या व्याजाचे २६ कोटी रुपये राज्य सरकारने जमा केले. त्या रकमेतून रुग्णवाहिका, अर्सेनिक अल्बम घेण्यात आल्या. परंतु अनेक ठिकाणी रुग्णवाहिकेला डिझेलच नाही.

एकीकडे करोनामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट असून करोनावर लसीकरण हाच पर्याय असून लस उपलब्ध असताना आता सिरिंज व गोळ्या तातडीने प्रत्येक आरोग्य केंद्रात उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी वाकचौरे यांनी केली आहे.