अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- नगर जिल्ह्यात शहरापेक्षा ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग जास्त पसरत असल्याचे आढळून आले. तसेच करोनाबद्दल ग्रामस्थांच्या ग्रामीण भागात मनातील भीती कायम आहे. त्यामुळे चाचणी करून घ्यायलाच ते घाबरतात. कर्जत तालुक्यातील वायसेवाडी गावात असा प्रकार घडला.
कर्जत तालुक्यातील या गावी आरोग्य पथक अँटीजेन चाचणी करण्यासाठी दाखल झाले. मात्र, त्यांना पाहून गावकर्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली, मात्र गावातील माजी सैनिकांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी आपला लष्करी गणवेश चढविला आणि गावकऱ्यांकडे गेले.
त्यांच्यावर विश्वास ठेवत शेकडो ग्रामस्थ चाचणी करून घेण्यासाठी आले. सुदैवाने कोणीही पॉझिटीव्ह आढळून आले नाही. जिल्ह्यात सध्या हिवरे बाजारचा पॅटर्न राबविण्यास सुरवात झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ, राजेंद्र भोसले यांनी गावागावात चाचण्या करून बाधितांना विलगीकरणात ठेवण्याचा आदेश दिला आहे.
त्यानुसार अंगणवाडीसेविका, आशा कर्मचारी यांनी घरोघरी जाऊन आवाहन केले, ग्रामस्थांचे प्रबोधन करून त्यांना चाचणीसाठी शिबिराकडे येण्याचे आवाहन केले. मात्र, कोणीही यायला तयार नव्हते.
मात्र कोरोनाच्या या शत्रूशी लढण्यासाठी शेवटी सैनिकालाच पुढाकार घ्यावा लागला. गावातील माजी सैनिक छगन सूळ आणि मिलिंद रेणूके यांनी गावकऱ्यांची समजूत काढली. हे पाहून गावकऱ्यांचे मतपरिवर्तन झाले. माजी सैनिकांवर विश्वास ठेवून ग्रामस्थ चाचणी करून घ्यायला तयार झाले.