अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- एका आठ जणांच्या टोळक्याकडून शहरातील सक्कर चौक परिसरात नवरा – बायकोला मारहाण केल्याची धोकादायक घटना घडली आहे.
या प्रकरणी पिडीत महिलेने फिर्याद दिली असून कोतवाली पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी यांच्या पतीचा केटरींगचा व्यवसाय आहे. त्यांचे सक्कर चौकात गोडाऊन आहे. तेथील जागेवरून फिर्यादी व आरोपी यांचे न्यायालयात वाद सुरू आहे.
शुक्रवारी रात्रीच्या वेळी फिर्यादी त्यांचे पतीसह गोडाऊन पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी गोडाऊन जवळ आवाज झाला. ते पाहत असताना राजेंद्र सोनार, संजय सोनार हे सहा अनोळखी इसमांसह भिंत पाडत असल्याचे त्यांना दिसले. त्यावेळी फिर्यादी यांनी याबाबत विचारणा केली.
न्यायालयात केस सुरू असुन हे करणे चुकीचे असल्याचे फिर्यादी यांनी आरोपींना सांगितले. याचा राग येऊन आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या पतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत
महिलेचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे.