मी फरार नाही, जामीन घेणार नाही काँग्रेस कार्यकर्ते एसपी ऑफिसवर हल्लाही करणार नाहीत जिल्हाध्यक्ष काळेंचे स्पष्टीकरण

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- विनयभंग गुन्हा प्रकरणात मला अटक होईल म्हणून मी पळून गेलो आहे. फरार आहे. अशा प्रकारच्या वावड्या, अफवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काल पासून शहरात जाणीवपूर्वक उठवल्या जात आहेत.

मी कुठेही पळून गेलेलो नाही. फरार नाही. मी इथेच नगर शहरामध्ये असून मी विनयभंगाचा माझ्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याच्या बाबतीत अटकपूर्व जामीन घेणार नाही. कारण मी गुन्हा केलेलाच नाही, असे स्पष्टीकरण शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे आयटी पार्कची काँग्रेसच्यावतीने किरण काळे यांनी पोलखोल केल्यामुळे नगर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

यामुळे किरण काळे आणि राष्ट्रवादीचे आ.संग्राम जगताप आमने-सामने आले असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सातत्याने सुरू आहेत. त्यातच अटकेच्या भीतीपोटी काळे यांनी शहरातून पळ काढला असून ते अटकपूर्व जामिनासाठी वकिलांच्या मार्फत धावपळ करीत असल्याची चर्चा शहरभर सुरू आहे.

त्या पार्श्वभूमीवर काळे यांनी प्रसार माध्यमांना प्रसिद्धी पत्रक काढत माहिती दिली आहे. किरण काळे यांनी म्हटले आहे की, माझे दैनंदिन कामकाज सुरू असून नागरिक, कार्यकर्त्यांच्या मी भेटीगाठी घेत आहे. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाल्याबद्दल काँग्रेसचे कार्यकर्ते, सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, शहरातील व्यापारी, उद्योजक, नागरिक यांचे असंख्य फोन मला येत आहेत.

मी कोणत्याही भगिनीचा विनयभंग केलेला नाही. आयटी पार्क भेटीची वस्तुस्थिती स्पष्ट करणारी सीडी काँग्रेसने पत्रकार परिषदेत जाहीरपणे वाजवली आहे. पोलिसांच्या सर्व कारवायांना सामोरे जायची आमची तयारी आहे. विरोधकांनी आमच्यावर राजकीय दबावातून खोटा गुन्हा दाखल केला आहे.

तपास कामी पोलीस प्रशासनाला शतप्रतिशत सहकार्य करण्याची आमची भूमिका असून पोलिसांनी अटक केल्यास त्याला देखील सामोरे जाण्यासाठी मी तयार आहे.

कारण आम्ही कायदा व सुव्यवस्था आणि न्यायव्यवस्थेला मानणारे आहोत. काळे पुढे म्हणाले की, कोणीही काळजी करू नये. लवकरच या खोट्या गुन्ह्यातून मी बाहेर येईल. कारण मी स्वच्छ आहे. काँग्रेस कार्यकर्ते हे सुसंस्कृत असून संयमी आहेत.

त्यामुळे पोलिस प्रशासनाने देखील चिंता करू नये. कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण करून नगर शहराच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल अशा प्रकारचे “त्यांनी” यापूर्वी केले तसे नीच दुष्कृत्य काँग्रेस कार्यकर्ते कदापि करणार नाहीत. माझ्यावर खोटा गुन्हा जरी दाखल झालेला असला

तरी देखील काँग्रेस कार्यकर्ते कुठल्याही परिस्थितीमध्ये एसपी ऑफिसवर हल्ला करणार नाहीत. पोलिसांनी मला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यास अथवा अटक केली तरी जिल्हा पोलिस अधिक्षकां समोरून मला काँग्रेस कार्यकर्ते पळवून देखील नेणार नाहीत.

त्यामुळे पोलिसांनी देखील याबाबतीत निश्चिंत राहावे, असे म्हणत काळे यांनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीच्या “त्या” नेत्यांना जोरदार टोला लगावला आहे. किरण काळे यांना विनयभंग प्रकरणात पोलीस अटक कधी करणार याची नगरकरांमध्ये चर्चा सुरू आहे.

Ahmednagarlive24 Office