अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- कोणी कितीही कागदपत्रे दाखवत असतील, पुरावे दाखवत असतील तर ते त्यांना दाखवू दे, मी भाजपचा सहयोगी सदस्य आहे पण खासदारपद मागण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो नव्हतो.
ते स्वतः माझ्याकडे आले होते, असे प्रत्युत्तर खासदार संभाजीराजे यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.
संभाजीराजे कितीही नाकारत असले तरी ते ऑनपेपर भाजपचे खासदार आहेत, भाजपचे नेते आहेत, असा चिमटा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी काढला होता. या पार्श्वभूमीवर बोलताना संभाजीराजे यांनी पाटील यांना प्रत्युत्तर दिले.
संभाजीराजे म्हणाले, मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, हे पद मागायला मी भाजपकडे गेलो नव्हतो, त्यांनीच स्वतःहून मला सन्मानाने हे पद दिले.
त्या बद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकच करतो. माझे सर्वच पक्षातील नेत्यांशी अतिशय चांगले संबंध आहेत. देवेंद्र फडणवीस असो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असो वा उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्वांशी माझे चांगले जमते.
राज ठाकरे हेदेखील मला जवळचे आहेत. आता तर प्रकाश आंबेडकर हेसुद्धा जवळचे झाले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षात आपले चांगले संबंध आहेत’, असे सूचक विधानही संभाजीराजे यांनी केले.
मराठा आरक्षण प्रश्नी सुरू असलेला लढा हा केवळ मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आहे, यामध्ये कोणताही राजकीय अजेंडा नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.