अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :-  विधानसभा सदस्याच्या मर्यादा ठरल्या आहेत, तशा अधिकाऱ्यांच्याही मर्यादा ठरल्या आहेत. हा गाडा व्यवस्थित चालवायचा असेल तर मर्यादेत राहूनच काम झालं पाहिजे असे सांगत मंत्री जयंत पाटील यांनी तहसीलदार ज्योती देवरे प्रकरणावर सूचक वक्तव्य केले.

थोडा त्रास होतोय, याची आम्हाला जाणीव आहे मात्र योग्य वेळी योग्य निर्णय होईल असा मला विश्वास आहे अशी पुष्टीही त्यांनी जोडली. सुपे व वाळवणे येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन मंत्री पाटील यांच्या हस्ते रात्री साडेअकराच्या सुमारास करण्यात आले.

तब्बल पाच तास उशीर होऊनही कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आ. निलेश लंके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी बोलताना पाटील पुढे म्हणाले, आ. लंके विधानसभेत अतिशय उत्तम काम करत आहेत, मात्र गेल्या काही दिवसात कोणीतरी त्यांच्यावर प्रश्नचिन्ह तयार करण्याचं काम जाणीवपूर्वक करत आहे, असा टोला त्यांनी नाव न घेता विरोधकांना लगावला. या गोष्टी राजकारणात होत असतात.

तर काही लोकांना मर्यादा सोडून वागण्याची सवय असते, मात्र प्रत्येकाने मर्यादेत राहून काम करायचं असतं असा सल्ला त्यांनी दिला. मी एवढीच अपेक्षा करेन की निलेश लंके यांच्यासारखे नेते लोकांत राहून काम करतात,

लोकांशी ऋणानुबंध असणाऱ्या नेतृवाला अश्या छोट्या, मोठ्या गोष्टींमुळे फार काही त्रास होईल, असं वाटत नाही, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.