अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-मी हाडाचा पैलवान असल्याने मला कुस्तीच्या खेळातील अनेक डावपेच माहित आहेत. त्यामुळे राजकीय पटलावर विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्या डावात मी सापडणारा नाही.
राजकीय डावपेचात माझा पुर्ता हातखंडा असल्याने विरोधकांचे स्वप्न धुळीस मिळवण्याचे काम केले आहे, अशा शब्दात माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी जिल्हा बँकेच्या निवडणूक निकालानंतर विरोधकांना सूचक इशारा दिला.
नगर तालुक्यात शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कुस्ती मैदानातील शेवटची एक लाख रुपयाची कुस्ती माजी मंत्री कर्डिले यांच्या हस्ते लावण्यात आली.
यावेळी उपस्थित पैलवानासह प्रेक्षकांसमोर ते बोलत होते. पुढे बोलताना कर्डिले म्हणाले, जिल्हा बँकेत मी कधी राजकारण केले नाही सातत्याने शेतकरी हिताचे निर्णय बँकेत घेण्याचा मी प्रयत्न केला.
बँकेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले माझ्या प्रयत्नांमुळेच बँकेत सतरा संचालक बिनविरोध झाले. असे असताना मला मात्र निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ विरोधकांनी आणली असली,
तरी निवडणुकीच्या निकालाने नगर तालुक्यातील स्वाभिमानी जनतेने विरोधकांचे दात घशात घालण्याचे काम केले असून, कुस्तीच्या डावाबरोबरच मी राजकारणातील देखील अनेक डावपेच अवगत केले आहेत.
त्यामुळे विरोधकांच्या डावात येण्याइतका मी सोपा गडी नाही. बँकेची निवडणूक मला लढवण्यास भाग पाडणाऱ्यांना चार दिवस क्षणीक आनंद मिळाला असला तरी पुढचे दिवस आपलेच असून सर्व निर्णय शेतकरी हिताचे होतील.
अशी ग्वाही दिली. क्रिकेटच्या खेळा प्रमाणेच कुस्तीच्या खेळाला देखील जागतिक पातळीवर सर्वोत्तम दर्जा मिळावा. पैलवान घडवण्यासाठी मोठे शारीरिक परिश्रम घ्यावे लागतात.
गोर गरिबांची मुलं कुस्तीच्या आखाड्यात उतरून आपलं जीवन घडवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे या मुलांना प्रत्येक गावाने सन्मानाची वागणूक दिली पाहिजे असे आवाहन कर्डिले यांनी याप्रसंगी केले.