अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- नागवडे कारखाना हा कुणा एकाची खाजगी मालमत्ता नसून, कारखान्याच्या जडण घडणीसाठी महत्वाच्या असणाऱ्या जुन्या काळातील पैसे भरणाऱ्या सभासदांना हाकलून देणाऱ्यांना कोणीच माफ करणार नाही.
येणाऱ्या निवडणुकीत सिद्ध होणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार यांनी राज्य साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष स्व.शिवाजीराव नागवडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त नागवडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशव मगर आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरा प्रसंगी केले.
सध्या श्रीगोंदा तालुक्यातील नागवडे कारखाना निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकारण चांगलेच तापले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत.
पुढे बोलताना शेलार म्हणाले की, नागवडे कारखान्याचा कारभार चुकीचा चालू असून चुकीच्या कारभाराबाबत येत्या २६ तारखेला पुराव्यानिशी सर्वांसमोर माडणार आहे.
माजी उपाध्यक्ष केशव मगर यांनी बोलताना सांगितले की स्व.बापूंनी कारखान्याच्या माध्यमातून शिक्षण संस्था उभ्या केल्या. आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या राजकारणात एकही शिंतोडा उडून घेतला नाही, असे असेल तर सिध्द करावे.
राजकारण करताना मला आमदार, खासदार नाही व्हायचे. फक्त कारखान्याच्या माध्यमातून सुरू असलेले लोकांचे संसार बंद पडू नये. सामान्य सभासदांची कामधेनू संपू नये, यासाठी सारा खटाटोप असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.