ताज्या बातम्या

मी नथुराम गोडसे असतो तर मीही तेच केलं असत’ असं म्हणणाऱ्या समाजकंटकांवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा, काँग्रेसच आक्रमक

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News:६१ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत अहमदनगर केंद्रावर ‘मी पण नथुराम गोडसेच बोलतोय’ या नाटकाचे सादरीकरण काल रात्री झाले.

यावेळी नगर शहराच्या ऐतिहासिक पवित्र भूमीत काही विकृत मनोवृत्तीच्या समाजकंटकांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेच जाहीर समर्थन करत ‘मी नथुराम गोडसे असतो, तर मीही तेच केलं असत’ अस निंदनीय वक्तव्य केल आहे.

हा देशद्रोह असल्याची आक्रमक भूमिका शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत मांडली आहे. जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचे जाहीर उदात्तीकरण स्वतंत्र भारतात काँग्रेस कदापि खपवून घेणार नाही. नाटकाला काँग्रेस संरक्षण देण्याचे काम करेल. प्रयोग बंद पाडणाऱ्यांवर आणि गोडसेच्या विकृतीचे समर्थन करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ गुन्हे दाखल करून पोलिसांनी अटक करावी,

अशी मागणी काळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना तसे निवेदन काँग्रेस पाठवणार आहे. काल रात्री उशिरा प्रयोग सुरू असताना काही समाजकंटकांनी गोंधळ घालत प्रयोग रोखण्याचा प्रयत्न केला.

यावेळी कलाकारांवर हल्ला करण्याचा देखील हेतू समाजकंटकांचा होता काय ? हे तपासण्याची गरज आहे. या प्रकारामुळे कलाकारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

समाजकंटकांच्या या गटाचे नेतृत्व करणाऱ्या युवकाने ‘मी नथुराम गोडसे असतो, तर मीही तेच केले असते’ असे म्हटले आहे. तसा व्हिडिओ समोर आला आहे. म्हणजे यातून नेमका काय संदेश द्यायचा आहे ? यामागे कोणते विकृत समूह अथवा लोक आहेत ? याचा कसून तपास पोलिसांनी करावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. राज्य नाट्य स्पर्धा ही शासनाची स्पर्धा आहे.

या स्पर्धेमध्ये सादर केलेल्या या नाटकाच्या स्क्रिप्टला सेन्सॉर बोर्डाची कायदेशीर पूर्व परवानगी आहे. आक्षेप असणाऱ्यांनी त्यांचा आक्षेप सेन्सॉर बोर्डाकडे अथवा योग्य त्या व्यासपीठावर नोंदवावा. मात्र काहीही असलं तरी जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचं उदात्तीकरण कोणत्याही परिस्थितीमध्ये खपवून घेतले जाणार नाही.

नथुराम गोडसेच समर्थन करणाऱ्या अवलादी उद्या पाकिस्तान जिंदाबादचे देखील नारे देतील. ते काँग्रेस खपवून घेणार नाही. यातून या देशामध्ये सांस्कृतिक दहशतवाद निर्माण करण्याचा कुटील डाव हा काही जातीयवादी शक्तींच्या आशीर्वादाने देशात सुरू असल्याचा आरोप किरण काळे यांनी केला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या घटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य देखील दिले आहे.

मात्र या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे स्वैराचारात रूपांतर करत धुडगूस घालण्याचा प्रयत्न कुणी करू नये. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडवू नये. समाजामध्ये, धर्माधर्मात वाद लावू नये.

नरेंद्र दाभोळकर, कलबुर्गी यांच्या देखील या देशामध्ये दुर्दैवाने काही माथेफिरुंनी हत्या केल्या. नथुराम गोडसेचे अनुकरण करू इच्छिणाऱ्या माथेफिरुंनी भविष्यात काही अप्रिया घटना घडवल्या तर त्यास संपूर्णत: पोलीस जबाबदार असतील असा इशारा काँग्रेसने दिला आहे.

घटनेच्या चौकटीत राहून सांस्कृतिक व्यासपीठाच्या माध्यमातून अभिव्यक्त होणाऱ्या कलाकारांना आणि विचारांना संरक्षण देण्याची जबाबदारी ही पोलिसांची आहे. पोलीस ती पार पाडणार नसतील तर शहर जिल्हा काँग्रेस ती पार पाडेल.

पोलिसांनी तात्काळ स्वतः गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी काळे यांनी काँग्रेसच्या वतीने केली आहे. यावेळी काँग्रेसचे सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. बापू चंदनशिवे, सांस्कृतिक कार्याध्यक्ष दिगंबर रोकडे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते आदी उपस्थित होते.

काँग्रेसची या नाटकाला समर्थ असण्याची प्रमुख कारणे पुढील प्रमाणे :

१. गोडसेच्या समर्थकांकडून गांधीजींबद्दल पसरवण्यात आलेले गैरसमज या नाटकामध्ये खोडून काढण्यात आले आहेत.

२. प्रदीप दळवी लिखित शरद पोंक्षे अभिनीत “मी नथुराम गोडसे बोलतोय” या पूर्वी आलेल्या नाटकातील खोटे दावे उल्हास नलावडे यांच्या नाटकाने खोडून काढले आहेत.

३. मनुवादी अजेंडा चालवणाऱ्यांना अटकाव करण्याच काम हे नाटक करीत आहे.

४. व्हाट्सअप यूनिवर्सिटी मध्ये इतिहासाच अनेक वर्षांपासून नथुरांमचं समर्थन सुरू असणार विकृतीकरण देखील या नाटकाने खोडून काढल आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office