अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- एकेकाळी हिवरे बाजार हे दुष्काळी गाव होते परंतु आज शाश्वत ग्रामविकासाचे उत्तम उदाहरण तयार झाले आहे. रोजगार हमी योजनेसाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद असून, त्यातून गावाचा शाश्वत विकास होऊ शकतो.
शाश्वत विकासासाठी आणि पाणलोट विकास कामासाठी सध्यातरी शासनाकडून स्वतंत्र निधी उपलब्ध होणे अवघड आहे. रोजगार हमी योजनेतून गावातील विकासकामे करून आदर्श गावे निर्माण होऊ शकतात असा विश्वास राज्य सरकारच्या रोजगार हमी योजना, मृद व जलसंधारण विभागाचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार यांनी व्यक्त केला.
नुकतीच आदर्शगाव हिवरे बाजारला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी हिवरे बाजार येथील कामाची पाहणी केली पद्मश्री पोपटराव पवार यांनी माहिती दिली. राज्यातील प्रत्येक शेतकरी समृद्ध होण्यासाठी हिवरे बाजार मधील शेतकऱ्यांनी ज्या ज्या उपाययोजना वापरल्या त्यासंदर्भात शेतकऱ्यांशी खुली चर्चा केली व गेली ३० वर्षामध्ये हिवरे बाजार गावाने विकासाचे टप्पे कसे पार केले याविषयी सविस्तर माहिती घेतली.
राज्यातील सर्व गावांना विकासाच्या मार्गावर घेवून जाण्यासाठी पद्मश्री पोपटराव पवार एक मार्गदर्शकाची भूमिका पार पाडतील अशी अपेक्षा व्यक्त केली.यवेळी प्रगतीपथावर असलेल्या यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्रास भेट देवून इमारतीच्या बांधकामाचा आढावा घेतला.
तसेच राज्यातील शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र लवकरच सुरु होईल यासाठी प्रयत्न करण्याबाबत सूचना दिल्या. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध असल्याने आदर्श गाव योजना व म.न.रे.गा.यांची सांगड घालून महाराष्ट्रील प्रत्येक शेतकरी लखपती होईल यासाठी विभागाचा प्रयत्न राहील असे सांगितले.
गावाचा विकास सामुदायिक प्रयत्नांनी होत असतो, तोच प्रयत्न हिवरे बाजार गावाने केला. असाच प्रयत्न राज्यातील इतर गावांनी केल्यास गाव आदर्श होईल असे पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.