अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-कोरोना महामारीत सर्वसामान्य रुग्णांची खाजगी हॉस्पिटलमध्ये लूट होत असताना अशा हॉस्पिटलची नावे पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने अमरधामच्या प्रवेशद्वारात टांगून त्याला धोत्र्याची फुले वाहून मृतांजली वाहण्यात येणार आहे.
तर रुग्णांची लूट करणारे खाजगी हॉस्पिटलमधील भेडिया डॉक्टर ओळखा व समाजाला कळवा अशी घोषणा करण्यात आली असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी व अशोक सब्बन यांनी दिली.
कोरोनाच्या दुसर्या लाटेत आरोग्य यंत्रणेची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत निर्माण झालेल्या परिस्थितीवरुन आरोग्य यंत्रणेने अजून सक्षम व सज्ज होणे आवश्यक होते.
मात्र तसे झाले नाही. सरकारी हॉस्पिटल व यंत्रणा कमी पडू लागल्याने खाजगी दवाखान्यांना सुगीचे दिवस आले आहेत. कोरोना रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिलांची वसुली केली जात आहे.
रुग्ण दगावल्यास पुर्ण बील भरल्याशिवाय त्याचे मृतदेह देखील महापालिका कर्मचारींच्या ताब्यात देण्यास हॉस्पिटल प्रशासन तयार नाही. कोरोनासाठी लागणार्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा देखील काळाबाजार सुरु झाला आहे.
अशा परिस्थितीत रुग्णांचे नातेवाईक हवालदिल झाले असून, सर्वसामान्य नागरिकांना कोरोना उपचाराच्या नावाखाली कर्जबाजारी करण्याची वेळ खाजगी हॉस्पिटल चालकांनी आनली आहे.
खाजगी हॉस्पिटलवर सरकारी यंत्रणेचे नियंत्रण व धाक नसल्याने ही अनागोंदी माजली आहे. तर सरकार राम भरोसे चालू असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.