अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- गौरी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने मोदक बनवा व पूजा थाळी सजवा स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये महिलांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. महिलांनी विविध प्रकारचे पौष्टिक मोदक बनवले. तर पूजेची थाळीची आकर्षक सजावट करण्यात केली होती.
या स्पर्धेतील विजेत्या महिलांना महापौर रोहिणीताई शेंडगे, नगरसेविका शितल जगताप यांच्या हस्ते बक्षिस वाटप करण्यात आले. यावेळी पूजा गुंदेचा, डॉ. योगिता सत्रे, शकुंतला शेटीया, ग्रुपच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा, उपाध्यक्षा अनिता काळे, सविता गांधी, शोभा पोखरणा, शकुंतला जाधव, ज्योती कानडे, शशिकला झरेकर, चंद्रकला सूरपुरिया, नीता माने, दीपा मालू आदिंसह महिला उपस्थित होत्या.
महापौर रोहिणीताई शेंडगे म्हणाल्या की, महिला सक्षम असल्यास कुटुंब सक्षम बनते. सण समारंभामध्ये खरी उत्सव मूर्ती घरात महिलाच असते. तिच्या उत्साहाने घरामध्ये सुख, शांती आणि समाधान नांदते. त्यामुळे महिलांनी सक्रिय होऊन आपल्या कुटुंबाबरोबर समाजासाठीही कार्यरत व्हायला हवे आपल्या शक्तीचा बुद्धीचा वापर जर समाजातल्या विधायक कामांसाठी झाला तर निश्चितच समाजव्यवस्था विकासाच्या दृष्टीने वाटचाल करू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अयुरयोग ट्रेनिंग आणि रिसर्च इन्स्टिट्यूट अंतर्गत गर्भसंस्कार वर्गाचे महत्व विशद करताना योगिता सत्रे म्हणाल्या की, आरोग्यदायी भारत निर्माण करणे हे या ग्रुपचे प्रमुख उद्दिष्ट आहे. संतती जर विशिष्ट उद्देश मनात ठेवून निर्माण झाली तर ते संस्कार अंतर्गत रुजतात व त्यामुळे उद्देश फलित होतो.
जसे की राजमाता जिजाऊ यांनी राष्ट्ररक्षण अर्थ पुत्र निर्मिती व्हावी हा हेतू मनात बाळगला छत्रपती शिवाजी राजे यांच्यासारखा महान राजे महाराष्ट्राला मिळाले. गर्भसंस्कार हा आयुष्य नैतिकदृष्ट्या जगण्यासाठी केलेला एक वैज्ञानिक संस्कार आहे. त्यामुळे निश्चितच संस्कार संपन्न भावी पिढी निर्माण होऊ शकते. त्यामुळे गर्भवती महिलांनी या संस्कार वर्गांचा लाभ घेण्याचे त्यांनी आवाहन केले.
वास्तुशास्त्र तज्ञ पूजा गुंदेचा म्हणाल्या की, आपल्या जीवनात पंचतत्त्वांच्या संतुलन खूप महत्त्वाचे आहे. शरीरातील संतुलन या तत्त्वांचे संतुलन बिघडले की, रोग उत्पन्न होतात. तसेच वास्तू शास्त्र देखील तत्वांचे संतुलन बिघडले की वास्तु दोष निर्माण होतात. घरामध्ये सकारात्मक उर्जेचा वास असणे खूप महत्त्वाचे आहे. तो वाढवण्यासाठी आध्यात्मिक मार्गाने चांगली कर्म करणे ही खूप महत्त्वाचे आहे.
ब्रम्हांड नियमानुसार आपण ज्या भावनेने विचारांनी कार्य करतो त्याची बीजे स्वरूप ऊर्जा आपण पेरत असतो. त्याचे फळही आपणास मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगरसेविका शीतल जगताप यांनी ही स्पर्धात्मक उपक्रमात भाग घेतलेल्या सर्वांचे अभिनंदन केले. प्रास्ताविकात उपाध्यक्षा अनिता काळे यांनी ग्रुपच्या वतीने महिलांसाठी राबविण्यात येणार्या विविध उपक्रमाची माहिती दिली.
मोदक बनवा स्पर्धेमध्ये प्रथम- सुवर्णा नागोरी, द्वितीय-सीमा केदारे, तृतीय- दीपा राछ, उत्तेजनार्थ- शोभा पोखरणा, तसेच पूजा थाळी सजवा स्पर्धेत प्रथम-पुष्पा मालू, द्वितीय- रेखा फिरोदिया यांनी बक्षिसे पटकाविली. या स्पर्धेसाठी शकुंतला शेटीया यांनी बक्षिसांचे प्रायोजकत्व लाभले.
यावेळी चि. मेधांश मुंदडा याने पियानोवर संगीताच्या माध्यमातून बहारदार स्वागत गीत सादर केले. शिक्षक दिन निमित्ताने ग्रुपच्या उपाध्यक्षा असलेल्या शिक्षिका अनिता काळे व अनिता माने यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता माने यांनी केले. आभार दीप्ती मुंदडा व दीपा मालू यांनी मानले.