अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- करोना प्रादूर्भावामुळे गेल्यावर्षी सर्वच पालखी सोहळ्यांवर शासनाने बंदी घातली होती. राज्यातील प्रमुख मानाच्या नऊ दिंड्या व प्रत्येक दिंडीत फक्त 20 वारकर्यांना परवानगी दिली होती.
राज्यातील करोनाचे संकट कमी होत असल्याने पुण्यातील बैठकीत पायी दिंडी सोहळ्याबाबत काय निर्णय होतो याकडे सर्व वारकर्यांचे लक्ष लागले आहे. यातच पायी दिंडी सोहळा कसा निघेल याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
पंढरपूरच्या आषाढी एकादशी दिंडी सोहळ्याबाबत निर्णय घेण्यासाठी राज्यातील सर्व दिंडी सोहळ्याचे प्रमुख व शासनाचे पदाधिकारी-अधिकारी यांच्यासमवेत पुणे येथे काउन्सिल हॉलला बैठक होणार आहे.
पायी दिंडी सोहळ्याला परवानगी देण्याची मागणी आपण बैठकीत करणार आहोत, अशी माहिती संत निळोबाराय संस्थानचे कार्याध्यक्ष अशोक सावंत यांनी दिली.
यावेळी सावंत म्हणाले की, दिंडी सोहळ्यात सहभागी होणार्या वारकर्यांची करोना चाचणी व लसीकरण करण्यात येईल. मागील वर्षीप्रमाणे याहीवर्षी एसटीने वारी जाईल की पायी वारी जाणार हे अजून निश्चित नाही. दिंडी सोहळा हा पायीच पार पडला पाहिजे हा सर्व दिंड्यांचा आग्रह आहे.
शासनाने 50 किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना सोबत घेऊन जाण्याची परवानगी दिली तर प्रत्येक दिंडीतील प्रतिनिधींना संधी दिली जाईल.
अनेक राज्यांत निवडणुका-पोटनिवडणुका होऊ शकतात तर दिंडी पालखी सोहळा पायी वारीने का पार पडू शकत नाही, असा सवाल दिंडीतील प्रतिनिधी व वारकर्यांनी केला आहे.
शासनाकडे आम्ही पायी दिंडी सोहळा कसा निघेल याबाबत उपाययोजना करण्याची मागणी पुण्यातील बैठकीत करणार असल्याचे ते म्हणाले.