अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- या सरकारचं एक मस्त आहे. यांचं एकमेकांशी पटत नाही आणि यांचं एका गोष्टीवर एक सुरू आहे. एकमेकांचे लचके तोडत आहेत. पण, सत्तेचे लचके तोडताना तिघंही एकत्र आहेत. जिथे धडपडले. जिथे नापास झाले.
तिथे एकाच सुरात बोलतात… हे मोदीजींनी केलं. मोदीजींनी केलं पाहिजे. मला तर असं वाटतं की, एखाद्या दिवशी यांच्या बायकोनं मारलं,तर त्यासाठीही मोदीजींनाच जबाबदार ठरवतील, अशी परिस्थिती यांची झाली आहे,
अशी कोपरखळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावली. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपाने आज (२६ जून) राज्यभरात चक्का जाम आंदोलन केलं. नागपुरात देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनात सहभागी होत महाविकास आघाडी सरकारवर आरक्षणाच्या मुद्द्यावरून टीकास्त्र सोडले.
फडणवीस म्हणाले, “भाजपा हजारो कार्यकर्ते ओबीसींच्या हक्कां करिता रस्त्यावर उतरले आहेत. माझा विश्वास आहे की, एक तर सरकारला ओबीसींचं आरक्षण पुन्हा द्यावं लागेल, नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल.
बावनकुळे म्हणतात ते खरंय. हे आरक्षण राजकीय षडयंत्रामुळे गेलंय. आणि हे किती नाटकबाज आहेत. कालपासून नवीन सूर सुरू झाला. मोदीजींनी डेटा दिला नाही. मी चॅलेंज देऊन सांगतो. सत्तेत असलेल्या पक्षांच्या नेत्यांना खुलं चॅलेंज देतो.
कुठल्या डेटाच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण द्यायला सांगितलं आहे. हा जनगणनेचा डेटा नाहीये. तो इम्पिरिकल डेटा आहे आणि तो राज्य मागासवर्ग आयोगाला जमा करायचा आहे. स्वतः काही करायचं नाही.
मराठा आरक्षण घालवलं. ओबीसी आरक्षण घालवलं. सगळ्या घटकांना जमीनदोस्त करायचं आणि मोदीजींनी केलं. मोदींमुळे झालं म्हणायचं. म्हणूनच म्हणालो, यांच्या बायकोनं मारलं तरी म्हणतील मोदीजीच जबाबदार आहेत.
पण, ये पब्लिक है, ये सब जानती है. ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी कोण… तुम्ही सगळ्यांनी लिहून घ्या… ओबीसी आरक्षणाची जी याचिका दाखल झाली, ज्या याचिकेमुळे हा निकाल आला, ही याचिका दोन जणांनी दाखल केली होती.
पहिला व्यक्ती म्हणजे वाशिममधल्या काँग्रेस आमदाराचा मुलगा आणि दुसरा व्यक्ती भंडारा जिल्हा परिषदेचा काँग्रेसचा अध्यक्ष…, असं म्हणत काँग्रेस ओबीसी आरक्षणाचे खरी मारेकरी आहे” असा गंभीर आरोप फडणवीस यांनी काँग्रेसवर केला.