वावर है तो मुमकिन है!! महिला शेतकर्‍यांनी नापीक जमिनीवर पपईचे घेतले दर्जेदार उत्पादन; एकाच वर्षात 40 लाखाची कमाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer succes story :केल्याने होत आहे रे ते आधी केलेच पाहिजे! आपण ही म्हण वारंवार ऐकत असतो. मात्र या म्हणीचा खरा अर्थ सिद्ध करून दाखवला आहे तो छत्तीसगड राज्यातील एकूण 43 महिला शेतकऱ्यांनी. छत्तीसगड राज्यातील 43 महिला शेतकऱ्यांनी शेती व्यवसायात असे नेत्रदीपक यश मिळवले आहे की पुरुषांना देखील याचा हेवा वाटेल.

मित्रांनो तीरथगड येथील मौजे मदनपुरच्या 43 महिलांना रिकामे बसण्यापेक्षा काहीतरी जरा हटके करण्याचा विचार आला. या महिलांनी घरी बसून राहण्यापेक्षा शेती (Farming) करावी असा निर्णय घेतला.

त्यांच्या गावातच सरकारी पडीक (Barren Government Land) जमीन होती. त्यामुळे या महिलांनी रिकाम्या पडलेल्या या पडीक जमिनीत शेती करण्याचा मनोमनी विचार केला. मात्र या पडीक जमिनीत सर्वत्र दगड गोटे होते, जमीन पूर्ण खडकाळ होती यामुळे हि नापीक जमीन पाहून या महिला शेतकऱ्यांचा आत्मविश्वास डबघाईला गेला.

मात्र इच्छा असली म्हणजे मार्ग हा दिसतोचं असंच काहीसं झालं या महिलासोबत. जिल्हा प्रशासन बस्तर आणि शेतकरी कल्याण संघाने या महिलांना मोठे प्रोत्साहन दिले मग काय जिद्दीने पेटून उठलेल्या या 43 महिलांनी देखील कंबर कसली आणि दगड गोटे आणि खडकाळ असलेली 10 एकर ओसाड शेतजमीन सुपीक करूनच सोडली.

40 ट्रक दगड हाताने वेचून शेताबाहेर फेकले
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, खडकाळ जमीन असल्याने शेती करणे खरं पाहता मोठ्या जिकिरीचे होते. मात्र या महिलांनी या खडकाळ जमिनीत पपईची शेती (Papaya Farming) करण्याचा निर्णय घेतला.

ओसाड असलेल्या पडिक जमिनीत पपई लागवड करणे हा एक नवीन प्रयोग होता. सुरुवातीला काही महिलांनी हा प्रयोग अयशस्वी होण्याच्या भीतीने हे काम सोडले. मात्र या गटातील 43 जिद्दी महिलांनी खचून न जाता लढण्याचे ठरवले.

मग काय या 43 महिलांनी आपल्या पूर्ण क्षमतेने आणि यश संपादन करायचेच या हेतूने आपले काम सुरू ठेवले. या महिलांचा आत्मविश्वास एवढा प्रबळ होता की त्यांनी हाताने 40 ट्रकहून अधिक दगड वावराबाहेर काढून तितक्याच प्रमाणात त्या जमिनीत लाल माती टाकली.

महिलांच्या प्रयत्नांनी नापीक जमीन बनली सुपीक
जेव्हा जमीन सुपीक होऊ लागली तेव्हा बस्तर किसान कल्याण संघाने अमिना जातीच्या पपईच्या लागवडीसाठी रोपे उपलब्ध करून दिली. जिल्हा प्रशासनाने सिंचनाची व्यवस्था आणि ताराबंदी केली. त्याचा परिणाम आज त्यांना चांगले पीक व भावही चांगला मिळत असताना दिसत आहे. आता इथली पपई दिल्ली आणि रायपूरच्या बाजारात आपला गोडवा वाटू लागली आहे.

40 लाखांचा नफा
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, जुलैपासून आतापर्यंत पपईचे उत्पादन सतत सुरु आहे. आतापर्यंत या गटाला 40 लाख रुपयांचा नफा झाला असून, अद्याप पीक निघत आहे. म्हणजेच 11 महिन्यांत महिलांनी प्रत्येकी 1 लाख रुपये कमावले आहेत.

या महिलांची इच्छाशक्ती एवढी प्रचंड आहे की आता या महिला पपई नंतर आणखी दुसरे पीक लागवड करण्याच्या तयारीत आहेत. या महिलांच्या मते, कष्टाने हिरवीगार झालेली भूमी आता पुन्हा ओसाड होऊ द्यायची नाही. निश्चितच या महिलांनी मिळविलेले हे नेत्रदीपक यश इतर शेतकऱ्यांसाठी विशेषता महिला शेतकऱ्यांसाठी मोठं प्रेरणा देणारे सिद्ध होणार आहे.