अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :-शनिवार व रविवार विकेंड लॉकडाऊन व येत्या सोमवारपासून मेडिकल, हॉस्पिटल वगळता उर्वरित अत्यावश्यक सेवा सकाळी सातपासून अकरा वाजेपर्यंत सुरू राहतील,
या व्यतिरिक्त सबळ कारणाशिवाय रस्त्यावर फिरताना कोणी आढळले, तर कोविड चाचणी करून कोविड केंद्रात सक्तीने भरती करण्याचा निर्णय आढावा बैठकीत घेण्यात आला.
तहसीलदार यांच्या दालनात आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार मोनिका राजळे, तर प्रमुख अधिकाऱ्यांमध्ये प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार श्याम वाडकर,
वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक कराळे, गटविकास अधिकारी शीतल खिंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, पालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, नायब तहसीलदार पंकज नेवसे, पालिकेचे कार्यालय अधीक्षक आयुब सय्यद,
नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे आदी उपस्थित होते. परगावाला विशेषतः पुण्या, मुंबईला स्थायिक झालेले चाकरमाने कुटुंबासह गावाकडे परतत आहेत.
तोडणी हंगाम अर्धवट टाकून बहुसंख्य तोडणी कामगारांनी गावाकडची वाट धरली. यामुळे तालुक्यात रोगाचा फैलाव वेगाने होत असल्याबद्दल उपस्थित अधिकाऱ्यांनी चर्चा करत रुग्णांच्या वाहतुकीसाठी शाळांच्या बसेस व अन्य शाळांच्या इमारती कोविड ताब्यात घेण्याबाबत चर्चा झाली.
खासगी कोविड सेंटरचे पात्र प्रस्ताव त्वरित मंजूर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. यावेळी आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, ऑक्सिजन उपलब्धता, लसीकरण व रुग्णांसाठी मूलभूत अत्यावश्यक सुविधांबाबत आरोग्य यंत्रणा प्रशासनाने गांभीर्यपूर्वक नियोजन करावे.
कसल्याही प्रकारची दिरंगाई व चालढकल रुग्णांच्या जीवाशी खेळणारी ठरू शकते, याचे भान ठेवून कर्मचारी व अधिकारी यांनी काम करावे. जीवावर उदार होऊन सर्व यंत्रणा तालुक्यात काम करीत आहेत. पण परिस्थिती त्यापेक्षा अधिक बिकट आहे.
लोकांनी स्वतः सावरावे, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. स्वच्छता, वैयक्तिक व सार्वजनिक वैयक्तिक व सार्वजनिक आरोग्याचे सर्व नियम पाळावेत. बाहेरगावच्या पाहुण्यांना आवरा. कौटुंबिक समारंभ मर्यादित स्वरूपात नियम पाळून करा, असे आवाहन आमदार राजळे यांनी केले.