राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना डिवचल्यास जशास तसे उत्तर देऊ, जिल्ह्यातील ‘ या’ आमदारांनी घेतली आक्रमक भूमिका

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- विरोधकांकडे विकास करण्याची मानसिकता नसून विकासाला विरोध करायची त्यांची भूमिका आहे. त्यामुळे निश्चितपणे शहर विकासाला खीळ बसली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते संयमी आहेत याचा अर्थ ते कोणाला घाबरतात असा गैरसमज कोणीही करून घेऊ नये. यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना डिवचल्यास रस्त्यावर उतरून जशास तसे उत्तर देणार असल्याचा गर्भित इशारा आमदार आशुतोष काळे यांनी विरोधकांना दिला आहे.

कोपरगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित युवा पदाधिकाऱ्यांचा पदवितरण समारंभ आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते सोमवार (दि.२६) रोजी पार पडला याप्रसंगी त्यांनी आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली.

यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, कार्यकर्त्यांना ज्या-ज्या ठिकाणी माझी गरज भासेल त्या-त्या ठिकाणी मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला घरी जाऊन धमकावणे यापुढे कदापि खपवून घेतले जाणार नाही.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संयमी आहेत मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे दुसरे रूप यापूर्वी विरोधकांनी हल्लाबोल आंदोलनाच्या वेळी अनुभवले आहे. त्यामुळे मी जास्त काही सांगणार नाही मात्र जशास तसे उत्तर देण्यास कधीही मागे हटणार नाही.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या केसालाही धक्का लागला तर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.युवक हा संघटनेचा आत्मा आहे. युवकांमध्ये क्रांति घडविण्याची ताकद असून युवकांनी आपल्या ताकदीचा योग्य उपयोग पक्ष वाढीसाठी करून शहर विकासासाठी योगदान द्यावे.

आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील मावळे आहोत त्यांच्या आदर्श विचारांवर आपली वाटचाल सुरु असून त्यांच्या शिकवणीप्रमाणे प्रत्येक महिला-भगिनींचा आदर ठेवावा असे कार्यकर्त्यांना आवाहन केले.

यावेळी मनोगत व्यक्त करतांना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले यांनी “कोपरगाव नगरपरिषद अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध करून या मागील खरे कारण एका प्रभागातील ८८ लाखांची गटारीचे काम आहे.

ते काम त्यांना मिळण्यास अधिकाऱ्यांनी सहकार्य केले नाही त्यामुळे त्यांचा २५-३० लाखांचा मलिदा मिळाला नसल्याचा हा उद्रेक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी नवाज कुरेशी, बाळासाहेब रुईकर, अशोक आव्हाटे, धनंजय कहार, महेश उदावंत, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, पंचायत समितीचे उपसभापती अर्जुनराव काळे, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,

नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, हाजी मेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश गवळी, सुनील बोरा, कार्याध्यक्ष संदीप कपिले, प्रशांत वाबळे, वाल्मिक लहिरे,

फकीरमामु कुरेशी, अशोक आव्हाटे, प्रा.अंबादास वडांगळे, चंद्रशेखर म्हस्के, सचिन परदेशी, राहुल देवळालीकर, जावेद शेख, संतोष शेलार आदींसह सर्व सेलचे अध्यक्ष, पक्षाचे पदाधिकारी, नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24