अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. यापुढच्या काळात कोरोना बाधित रुग्णांची संख्या अशीच वाढत गेली तर प्रत्येक शहरात भयावह स्थिती निर्माण होईल. ग्रामीण व शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये अनेक रुग्ण उपचार घेत आहेत.
त्यामुळे रुग्णांना आयसीयू, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड रुग्णांसाठी कमी पडू लागले आहेत. यासाठी राज्यातील सर्व पालकमंत्री व आमदार यांनी प्रत्येकी हजार ते दोन हजार क्षमतेचे मोफत कोविड सेंटर उभे करण्याच्या सूचना द्याव्यात.
त्यामुळे कोरोना बाधितांना कोविड सेंटरमध्ये तात्काळ उपचार मिळाल्याने कोरोनाचा प्रसार कमी होण्यास मदत होईल, अशी मागणी मनसेचे डॉ.संतोष साळवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
साळवे यांनी निवेदनात म्हटले आहे की, जे रुग्ण पॉझिटिव्ह आहेत त्यांना बेड मिळत नसल्यामुळे घरीच आयसोलेट होत असल्याने ते इतरांच्याही संपर्कात येतात.
त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मोफत कोविड सेंटर उभे केल्यामुळे रुग्णांची खाजगी हॉस्पिटलमध्ये आर्थिक लूट केली जात आहे, ती थांबेल व रुग्णांना आर्थिक दिलासाही मिळेल.