अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :- राज्य सरकारने जाहीर केलेले पॅकेज म्हणजे केवळ धूळफेक असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे केंद्रात वजन असेल तर त्यांनी महाराष्ट्राचे केंद्रात अडकलेले ९० हजार कोटी रुपये मिळवून द्यावेत, असे आवाहन पटोले यांनी केले आहे.
फडणवीस यांचे केंद्रात वजन नसल्याचा खोचक टोला लगावताना राजकारण न करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. पटोले म्हणाले, कोरोनामध्ये सर्वजण अडकले आहेत.
या काळात राजकारण करण्यापेक्षा दिल्लीत वजन वापरून महाराष्ट्र सरकारचे अडकलेले जीएसटी आणि अन्य असे ९० हजार कोटी रुपये मिळवून द्यावेत.
हे पैसे मिळाले तर राज्याला वेगळा निधी देण्याची गरज नाही. आमचे पैसे केंद्राने द्यावेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लागू केलेले कडक निर्बंधांचे काँग्रेस पक्ष समर्थन करत असून त्यांनी दिलेल्या पॅकेजबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदनही करतो.
या मदतीमधून अनेक घटक सुटले आहेत. जसे की केशकर्तनालय, फुलांचा व्यापार करणारे विक्रेते यासारख्या घटकांचा त्यात समावेश होणे आवश्यक आहे.
त्यासाठी आम्ही मुख्यमंर्त्यांकडे पाठपुरावा करू. तसे पत्रही मुख्यमंर्त्यांना देणार असल्याचे पटोले म्हणाले. देशात सर्वत्र कोरोना पसरत आहे.
मात्र पंतप्रधान निवडणुकांमध्ये व्यस्त आहेत. ते मास्क न वापरता प्रचार करत आहेत. यातून काय संदेश जातो? असा सवालही पटोले यांनी केला.