पुन्हा दुकाने सुरु केली तर जेसीबी लावून पाडू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:- नगर तालुक्यातील सारोळा कासार-घोसपुरी रस्त्यावर घोसपुरी गावाच्या शिवारात खानावळीच्या नावाखाली अवैध दारूविक्रीची दोन दुकाने थाटलेली आहेत.

या अवैध दारूविक्री दुकानांविरोधात घोसपुरी (ता. नगर) येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत ही दुकाने बंद पाडली. तसेच पुन्हा ही दुकाने सुरू झाल्यास ग्रामस्थ थेट कायदा हातात घेऊन दुकाने जेसीबी लावून पाडतील,

असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून घोसपुरी गावाच्या शिवारात खुलेआम मोठ्या प्रमाणात दारूविक्री होत असल्याने गावातील सामाजिक शांतता भंग पावत असल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी थेट दारू दुकानांमध्ये जात दुकानचालकांना ही दुकाने तातडीने बंद करण्यास सांगितले.

दुकाने सुरु ठेवली तर गावातील महिला व ग्रामस्थ आक्रमक होऊन कायदा हातात घेतील, असा इशाराही दिला. तसेच या विरोधात नगरला येऊन याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांनाही ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे.

यावेळी सरपंच किरण साळवे, उपसरपंच विठ्ठल हंडोरे, माजी उपसरपंच प्रभाकर घोडके, प्रा. अशोक झरेकर, राजेंद्र लांडगे, बाळासाहेब झरेकर, श्याम शेख, संजय खोबरे, बापू झरेकर, अनिल हंडोरे, किसन पारधे, बबन झरेकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24