अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- ‘आम्ही’ जर विरोधकांच्या व्यवसाया विषयी बोललो तर ते तुरुंगात दिसतील. खडी क्रेशरची ते सरकारला किती रॉयल्टी भरतात व किती भरत नाही हे आम्हाला माहिती आहे.

जर आम्ही हे जनतेसमोर आणले तर त्यांना जेलमध्ये जायची वेळ येईल, असा टोला जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांना नाव न घेता लगावला म. तर प्रताप पाटील शेळके यांच्या नगर तालुका सहकारी साखर कारखाण्याला सीना मोटर वाहतूक संस्थेच्या हिशोबाचे काय?

नगर मार्केट कमिटीचे कै.दादा पाटील शेळके असे नामकरण करताना प्रताप पाटील शेळके कुठे होते.असा टोला माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी लगावला. नुकतीच कर्डिले यांच्यावर महाविकास आघाडीच्यावतीने बाजार समितीच्या माध्यमातून गंभीर टीका करण्यात आली होती.

त्या टीकेला माजी मंत्री कर्डिले यांनी देखील तितक्याच आक्रमकपणे उत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर खास शैलीत टीका करताना म्हणाले की, कै.दादा पाटील शेळके नगर बाजार समिती ही अग्रस्थानी आहे.

परंतु विरोधकांना विरोध करण्यासाठी काही मुद्देच नाहीत त्यामुळे कै.दादा पाटील शेळके मार्केट कमिटीला टार्गेट करत आहेत. स्वतः चोऱ्या करायच्या अन आपले कर्तृत्व झाकण्यासाठी दुसऱ्यावर काहीतरी आरोप करायचे.

शेतकऱ्यांची दिशाभूल करून सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांचे केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका देखील कर्डिले यांनी केली.