अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :-काेरोना बाधित रुग्णांसाठी आमदार नीलेश लंके यांच्या पुढाकारातून भाळवणी येथे सुरू करण्यात आलेल्या शरदचंद्र आरोग्य मंदिरातील (कोविड उपचार केंद्र) अन्नदानासाठी तसेच विविध सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ सुरू आहे.
आतापर्यंत १७ लाख रुपये रोख स्वरूपात जमा झाले. तालुक्यातील मुंगशी येथील ग्रामस्थांनी गावातून जमा केलेले ५ टन धान्य व रोख ५० हजार रुपये उपचार केंद्रात जमा केले.
अन्न धान्याबरोबरच भाजीपाला, फळे, अंडी, किराणा, वाफ घेण्याची यंत्रे, कोमट पाण्यासाठी थर्मास अश्या विविध वस्तूंचा ओघही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
आमदार नीलेश लंके प्रतिष्ठान व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने व आमदार नीलेश लंके यांच्या पुढाकारातून भाळवणी येथे १ हजार १०० खाटांचे कोविड उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे.यापैकी १०० खाटांना प्राणवायूची सुविधा आहे.
उपचार केंद्रात दाखल झालेल्या रुग्णांना नाष्ट्याबरोबर अंडी, दूध दिले जाते. तर वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्याने प्रथिनयुक्त आहार देण्यात येतो. यासाठी दररोज मोठा खर्च येतो.
हा खर्च भागवण्यासाठी आमदार लंके यांनी तालुक्यातील जनतेला रोख अथवा वस्तू स्वरूपात मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात सुरू झालेल्या
करोनावर मात करण्यासाठी, मतदारसंघातील नागरिकांना आधार देण्यासाठी आमदार लंके झटत आहेत. गेल्या वर्षी त्यांनी कर्जुले हर्या येथे शरदचंद्र आरोग्य मंदिराची उभारणी करून तेथे एक हजार रुग्णांची सोय करण्यात आली होती.
तब्बल साडेचार हजारांहून अधिक रुग्णांनी तेथे काेरोनावर मात केली. काेरोनाची सामान्य लक्षणे असणाऱ्यां रुग्णांना खासगी रूग्णालयात दोन ते अडीच लाख रुपये मोजावे लागतात. या पार्श्र्वभूमीवर लंके
यांनी कर्जुले हर्या येथील मातोश्री शैक्षणिक संकुलात सुरू केलेल्या कोविड उपचार केंद्रात दाखल झालेल्या तब्बल साडेचार हजार रुग्णांवर विनामूल्य उपचार करण्यात आले. तालुक्यातील तसेच तालुक्याबाहेरील रूग्णांची कोट्यवधी रुपयांची बचत झाली.
गेल्या महिन्यात करोना संसर्गाची दुसरी लाट आली. यावेळची लाट मात्र पूर्वीपेक्षा अधिक गंभीर असल्याने प्रशासनाने आवाहन करताच आमदार लंके यांनी भाळवणी येथे शरदचंद्र आरोग्य मंदीर सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला.
भाळवणीच्या भुजबळ परिवाराने मोलाचे योगदान देत नागेश्वर मंगल कार्यालय काेरोना उपचार केंद्रासाठी मोफत उपलब्ध करून दिले. कोविड उपचार केंद्रात दाखल रूग्णांच्या भोजन इतर सुविधांसाठी आमदार लंके यांनी मदतीचे आवाहन केले होते.
त्यास तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी तब्बल १७ लाख रुपये जमा झाले अनेक नागरीक भाजीपाला, फळे, अंडी, धान्य आदी वस्तू उपचार केंद्रावर पोहच करीत आहेत. मुंगशी येथील नागरीकांना गावामध्ये घरोघर फिरून पाच टन गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ आदी धान्य संकलीत केले.