अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- नगर शहरातील बहुप्रतिक्षीत असलेल्या स्टेशन रस्त्यावरील सक्कर चौक ते जीपीओ चौकादरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू असून, त्याचे बहुतांश खांब (पिलर) उभे राहिले आहेत.
या खांबांवर आता सिमेंट प्लेटा टाकल्या जाणार असून, त्या अवजड जेसीबीच्या सहाय्याने उचलण्यात येणार आहे. या कामासाठी मोठी यंत्रसामग्री लागणार आहे.
ही सर्व कामे करताना याभागात वाहनांची वर्दळ असल्यास त्याचा या कामावर परिणात होवू शकतो, त्यामुळे मध्यरात्री १२ ते सकाळी ७ या वेळेत या रस्त्यावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.
दरम्यान, शहरातील अवजड वाहतूक रोखण्यासाठी हाईट बॅरिगेटस लावणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात खासदार डॉ.सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रफुल्ल दिवाण, मनपाच्या नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक राम चारठाणकर, शहर अभियंता सुरेश इथापे, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते.
खासदार विखे म्हणाले, उड्डाणपुलाचे काम किमान सहा महिने सुरू राहण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात १५ दिवसांसाठी स्टेशन रस्त्यावरील सर्व प्रकारची वाहतूक मध्यरात्री १२ ते सकाळी ७ अशी सात तास पूर्ण बंद ठेवली जाईल. याबाबत पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे.
अधिकृत आदेश त्यांच्याकडून जारी होतील. मध्यरात्रीनंतर सकाळी ७ वाजेपर्यंत या रस्त्यावर एसटी बसेसलाही परवानगी राहणार नाही. त्यामुळे नागरिकांनी या सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.