अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापण्यात आला.
आमची मागणी आहे की, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या मृत्यू प्रमाणपत्रांवरही पंतप्रधानांचा फोटो हवा.जर ते लसीकरणाचं श्रेय घेत असतील, तर त्यांनी मृत्यूची जबाबदारीही घ्यावी,
अशा शब्दात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. मलिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
त्यावेळी त्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनसंदर्भात मोदी सरकार महाराष्ट्राशी दुजाभाव करत असल्याचा आरोप केला.
केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडेसिवीरचे इंजेक्शन विकायला परवानगी मिळत नाहीये.
केंद्र सरकार त्यास नकार देत आहेत. राज्य सरकारने १६ कंपन्यांकडे विचारणा केली असता त्यांनी केंद्राने महाराष्ट्राला औषधी देण्यास नकार दिला असल्याचं सांगितले.
हे खेदजनक आणि धक्कादायक आहे, असे मलिक म्हणाले. देशातील रुग्णसंख्या वाढत आहे. मृतांचा आकडाही वाढत आहे.
अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमींमध्ये जागा नाही. लोकांना रांगा लावाव्या लागत आहे, असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
देशात ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे. केंद्राने उत्तर द्यावं, पळ काढू नये, असेही मलिक यांनी म्हणाले.